Kas Pathar | पर्यटकांसाठी 'कास'च झाले खास

दोनच दिवसांत २० हजार पर्यटकांची भेट; कास पुष्प पठारापासून पारंबे फाट्यापर्यंत लागलेल्या वाहनांच्या लांबच लांब रांगा.
kas pathar
पर्यटकांसाठी 'कास'च झाले खास Pudhari Photo
Published on
Updated on

बामणोली : पुढारी वृत्तसेवा

सातारा जिल्ह्याच्या बहुतांश भागात गेल्या काही दिवसांत पाऊस झाला. निसर्ग पर्यटनस्थळे बहरली, धबधबे फेसाळून कोसळू लागले. मात्र, पर्यटकांसाठी 'कास'च खास असल्याचे पर्यटकांच्या आकडेवारीवरून दिसून आले आहे.

पाऊस असला तरी शनिवार आणि रविवार या दोन दिवसांत तब्बल २० हजारांहून अधिक पर्यटकांनी कास पुष्प पठाराला भेट दिली, तर या कालावधीत ऑनलाईन नोंदणी करणाऱ्यांचीही संख्येत तिपटीने वाढ झाली.

वर्दळ वाढल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून आल्या. यामुळे काही काळ वाहतूक कोंडीही झाली. पाऊस असला तरी फुलांचे गालिचे बहरले असल्याने दिवसेंदिवस पर्यटकांची वर्दळ वाढूच लागली आहे.

कास पठार कार्यकारी समितीच्या वतीने पठाराच्या दोन्ही बाजूला पर्यटकांच्या वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, रविवारी सकाळी ९ वाजताच पर्यटकांचा ओघ वाढला.

कासकडील पार्किंग फुल्ल झाल्याने पर्यटकांना कासानीत वाहने पार्क करावी लागली. पावसाने उघडीप दिल्याने दुपारी १२ नंतर पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. ऑनलाईन बुकिंग करून येणाऱ्या पर्यटकांपेक्षा ऑफलाईन येणाऱ्या पर्यटकांची संख्या ही ऑनलाईन बुकिंग करणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत तिप्पट असल्याने कास पठार कार्यकारी समितीच्या सर्व पदाधिकारी व कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली.

शनिवार आणि रविवार ऑनलाईन बुकिंग करणाऱ्या पर्यटकांची संख्या साडेपाच हजार होती. तर ऑफलाईन येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येतही वाढ झाल्याचे चित्र होते. वाहने वाढल्याने घाटाई फाटा ते पारंबे फाट्यापर्यंत २ ते ३ किमीच्या वाहनांच्या रांगा लागल्या. यामुळे पर्यटकांना ताटकळत उभे राहावे लागले.

कास कार्यकारी समितीचे कर्मचारी कमी पडू लागल्याने चक्क वनक्षेत्रपाल डॉ. निवृत्ती चव्हाण यांनी वाहतूक सुरळीत करण्याचे काम हाती घेतले. त्यांनी स्वतः रस्त्यावर उतरून ट्रॅफीक मोकळे करण्याचा प्रयत्न केला.

कास पठार कार्यकारी समितीकडून केले गेलेले बोकडे पडत असल्याचे दिसून आले दुपारी तीननंतर वाहनांच्या रांगा थोड्या फार कमी झाल्या. वनक्षेत्रपाल निवृत्ती चव्हाण, जावली वनपरिक्षेत्र अधिकारी अर्जुन गमरे, वनपाल राजाराम काशीद, निलेश रजपूत, वनरक्षक सुनील शेलार, समाधान वाघमोडे, कास पठार समितीचे अध्यक्ष दत्तात्रय किर्दत, उपाध्यक्ष प्रदीप कदम यांच्यासह सदस्य सकाळी ७ वाजल्यापासून सायंकाळपर्यंत ठाण मांडून होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news