

सातारा/भुईंज : कामोठे मुंबई येथून विटा (जि. सांगली) येथे कारमधून निघालेल्या सोने-चांदीच्या व्यापार्याला चोरट्यांनी मारहाण करत 20 लाखांची रोकड लंपास केल्याची खळबळजनक घटना घडली. पुणे-बंगळूर महामार्गावर वेळे गावच्या हद्दीत शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला असून, चोरटे पसार झाले आहेत. कारमधील आठ ते दहा जणांनी बेदम मारहाण केली आहे. दरम्यान, चोरट्यांच्या शोधार्थ भुईंज पोलिसांची दोन पथके रवाना झाली आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, फिर्यादी विशाल पोपट हासवे (रा. हिवरे ता. खानापूर जि. सांगली) हे म्हैसूर कर्नाटक येथे सोने आटणी कामगार आहे. तो, राहुल शिंदे व वैभव हासवे हे तिघेजण शुक्रवारी रात्री 11.30 वाजता गावाकडे कारमधून (एमएच01 ईआर 9468) निघाले होते. कापूरहोळ येथे ते चहा पिण्यासाठी थांबले. त्यानंतर चहा पिऊन ते पुढे निघाले. शनिवारी पहाटे 3 च्या सुमारास वेळे गावच्या हद्दीत त्यांच्या कारला स्कार्पिओ व इनोव्हा गाडी आडवी मारली. त्यामुळे कार थांबवण्यात आली. संशयित 8 ते 10 जणांनी लोखंडी गजाने कारची काच फोडून नुकसान केले. त्यानंतर विशाल याला मारहाण करत चाकूचा धाक दाखवला. त्यानंतर राहुल व वैभव यांना कारमधून खाली उतरवत मारहाण केली.
अंधाराचा फायदा घेत राहुल व वैभव यांनी तेथून पळ काढला. त्यानंतर लुटारूंनी विशालचे हातपाय बांधून अपहरण करत अन्य एका स्विफ्ट कारमधून त्याला नेले. यावेळी ते तोडके-मोडके हिंदी बोलत होते. त्यानंतर मला सोडून गेल्याचे विशाल याने फिर्यादीत म्हटले आहे. तेथून चालत आले असता सर्जापूर गावाजवळ व्हेन्यू कार आढळली.
मात्र, कारमधील असलेली 20 लाख रुपये रक्कम गायब झाली होती. या घटनेने खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी भुईंज पोलिस तातडीने दाखल झाले. शनिवारी सायंकाळपर्यंत चोरट्यांच्या शोधासाठी दोन पथके रवाना झाली आहेत. शनिवारी भुईंज पोलीस स्टेशनला जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, वाईचे उपविभागीय पोलिस अधिकारी बाळासाहेब भालचिम यांनी भेट देऊन तपास गतीने करण्याच्या सूचना केल्या. स्थानिक गुन्हे शाखा सातारा, भुईंज पोलीस डी. बी. शाखा यांच्या अधिकारी व कर्मचारी यांनी रात्री उशिरापर्यंत महामार्गावर तपास केला. घडलेल्या घटनेने जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या घटनेचा गुन्हा भुईंज पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून सपोनि रमेश गर्जे अधिक तपास करत आहेत.
महामार्गावर दरोड्याची घटना समोर आल्यानंतर सातारा एलसीबी पोलिस अॅक्शन मोडवर आले. तत्काळ माहिती घेऊन पथके रवाना झाली. गंभीर घटना पाहून सातारा एलसीबीने सांगली एलसीबी सोबत संपर्क करून तासगाव तालुक्यात मदत मागितली. त्यानुसार सातारा, सांगली पोलिसांनी गुन्ह्यातील एक कार व एका संशयिताला ताब्यात घेतले. प्राथमिक माहितीनुसार केरळ येथील टोळीने हा दरोडा टाकला आहे.