कराड : पुलावरील वाहतूक पावसाळ्याआधी होणार सुरू | पुढारी

कराड : पुलावरील वाहतूक पावसाळ्याआधी होणार सुरू

कराड ; पुढारी वृत्तसेवा : कराडलगत कृष्णा नदीवर सुमारे चार वर्षांपासून नवीन पुलाचे काम अतिशय धिम्या गतीने सुरू आहे. यामुळे जुन्या पुलावरून दुहेरी वाहतुक सुरू असून वारंवार वाहतूक कोंडी होत असते. याचा त्रास वाहनधारकांसह नागरिकांना सहन करावा लागत आहे. याची दखल घेऊन सहकारमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग उपविभागाच्या कोल्हापूर कार्यालयाशी संपर्क साधून पावसाळ्यापुर्वी काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार 25 मे पर्यंत काम पूर्ण करून या पुलावरून वाहतूक सुरू करावी, असा आदेश राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वतीने संबंधित ठेकेदाराला देण्यात आला असल्याची चर्चा असून त्यामुळे प्रशासन व ठेकेदाराने कामाची गती वाढवल्याचे दिसून येत आहे.

गुहागर ते विजापूर राष्ट्रीय महामार्गावर कराड शहरानजीक कृष्णा नदीवर नवीन उंच पूल बांधण्यात येत आहे. गेली चार वर्षांपासून या पुलाचे काम सुरू असून ते अतिशय धिम्या गतीने होत आहे. कृष्णा नदीवर असलला जुना पूल पावसाळ्यात नदीला आलेल्या महापुरात पडला होता. त्यामुळे चार वर्षांपासून तेथे अस्तीत्वात असलेल्या दुसर्‍या उंच पुलावरून दुहेरी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे या पुलावर वाहतुकीचा ताण येत असून दररोज वाहतूक कोंडी होत असते. या वाहतूक कोंडीला वाहनधारकांसह नागरिक प्रचंड वैतागले आहेत.
नवीन सुरू असलेल्या कृष्णा पुलाचे काम पूर्ण झाले आहे. पुलावर काही दिवसांपूर्वी डांबरीकरणही करण्यात आले आहे. मात्र, पुलाच्या दोन्ही बाजूकडील जोडरस्त्याचे काम रखडल्याने पुलावरून वाहतूक सुरू करता येत नाही. याबाबत ना. बाळासाहेब पाटील यांनी राष्ट्रीय महामार्ग उपविभागाच्या कोल्हापूर कार्यालयाला संपर्क साधून कराडलगतच्या कृष्णा नदीवरील नवीन पुलाच्या दोन्ही बाजूच्या जोडरस्त्याचे काम पूर्ण करून नवीन पुलावरून वाहतूक सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पालकमंत्र्यांच्या सूचनांनंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाने पुलाच्या कामाच्या देखरेकीची जबाबदारी असलेल्या टी.पी.एफ.इंजिनिअरिंग व प्रोजेक्ट मॅनेंजर मे.कल्याण राज देसाई यांना पत्राद्वारे 25 मेपर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

याबरोबरच कृष्णा पुलावर पथदिवे बसवणे, मिलिटरी होस्टेलकडे जाणारा रस्ता समतल करून पावसाळ्यापूर्वी वाहतुकीयोग्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच जुन्या पुलाचे जोडरस्ते खोलगट आहेत. त्यामुळे रस्त्यावर पाणी साचत आहे. त्यामुळे रस्त्याकडेच्या गटारांची साफसफाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, या पुलाच्या कामाचे प्रोजेक्ट मॅनेंजर मे. कल्याण राज देसाई हे आहेत. मात्र 25 मेपर्यंत पुलावरून वाहतूक सुरू करण्याचे आदेश असल्याने जोड रस्ते करण्याचे काम आता युनिटी बिल्टर या सबठेकेदार कंपनीला देण्यात आले आहे. दर्जेदार व जलद कामाबाबत युनिटी बिल्डरचा नावलौकीक आहे.

जोडरस्त्याच्या कामासाठी युनिटी बिल्डरची निवड केल्यानंतर जोडरस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाने दिलेल्या डेडलाईनमध्ये काम पूर्ण होण्याच्या कराडकरांना अपेक्षा आहेत.

वनवास संपणार अन् दिलासा मिळणार..!

सुमारे चार वर्षांपासून एकाच पुलावरून दुहेरी वाहतूक सुरू असल्याने कृष्णा पुलासह कृष्णा नाका ते कृष्णा कॅनॉल या रस्त्यावर दररोजच वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणारे नागरिक, विद्यार्थी व वाहनचालक अक्षरशा वैतागले आहेत. मात्र, आता पावसाळ्यापूर्वी नवीन पूल वाहतुकीसाठी खुला होणार असल्याने कराडकर नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Back to top button