कराड : गुढी…महिलांची रॅली… अन् जन्म सोहळा | पुढारी

कराड : गुढी...महिलांची रॅली... अन् जन्म सोहळा

कराड ; पुढारी वृत्तसेवा : येथील भेदा चौकात (शंभूतीर्थ) स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याचा संकल्प शहर व तालुक्यातील शिव-शंभूप्रेमींनी केला आहे. या स्मारक उभारणीच्या पार्श्वभूमीवर शनिवार, 14 मे रोजी छत्रपती संभाजी महाराज यांची 365 वी जयंती विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे.

सकाळी 8.30 वाजता गुढी उभारण्यात येणार आहे. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्माचा सोहळा आनंदात साजरा करण्यात येणार असून सकाळी 9 वाजता छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. यासाठी भव्य सेटची उभारणी करण्यात येत असून संपूर्ण चौकाला विद्युत रोषणाई व सजावट करण्याचे काम शुक्रवारी सायंकाळी अंतिम टप्प्यात आले होते. त्यानंतर सायंकाळी 5 वाजता 365 माता-भगिनींची पारंपरिक वेषात कराड शहरातून रॅली काढण्यात येणार आहे. ही रॅली शंभूतीर्थावर आल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्माचा पाळणा होणार आहे.

व्याख्याते प्रा. अरूण घोडके (इस्लामपूर) यांचे ‘छत्रपती संभाजी महाराज’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. तरी शनिवारी दिवसभर होणार्‍या विविध कार्यक्रमांना जिल्ह्यातील नागरिकांसह युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. शंभूतीर्थ परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी पार्किंगला सक्त मनाई करण्यात आली आहे. रत्नागिरी गोडावून, बैलबाजार मार्ग, छत्रपती संभाजी भाजी मार्केट या ठिकाणी चारचाकी व दुचाकी यांचे पार्किंग करावे, असे आवाहन संयोजन समितीकडून करण्यात आले आहे.

राज्याला हेवा वाटेल असे होणार स्मारक …

छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक संपूर्ण साकार होईपर्यंत विविध उपक्रम राबवून छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचाराच्या वाटेवर चालण्याचा संकल्प कराडकरांनी केला आहे. संपूर्ण महाराष्ट्राला हेवा वाटेल, असे हे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. या कार्यात सर्वांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Back to top button