सातारा : मालाच्या ‘नेट-वेट’ मध्ये तूट; ग्राहकांची लूट

सातारा : मीना शिंदे
सर्वसामान्यांच्या घरामध्ये उन्हाळ्यामध्येच अन्नधान्य, डाळी, कडधान्यासह वर्षभराची बेगमी खरेदी केली जाते. सध्या बाजारपेठेत मशीनवरील स्वच्छ व निवडक धान्याचे पॅकिंग खरेदीकडे नागरिकांचा कल वाढला आहे. मात्र, मालाच्या पॅकींगवरील नेट वेट आणि प्रत्यक्ष वजनामध्ये तूट आढळून येत असल्याने ग्राहकांची आर्थिक लूट होत आहे. जेवढे वजन तेवढेच पैसे आकारले जावेत, अशी मागणी ग्राहकांमधून जोर धरु लागली आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने धान्यासह डाळी, मिरच्या, उन्हाळी वाळवणांची लगबग घरोघरी सुरु आहे. पूर्वीप्रमाणे भरपूर नसले तरी वर्षभरासाठी आवश्यक तेवढे धान्य साठवण आजही केली जाते. त्यासाठी बाजारपेठेत मशीनवरील स्वच्छ व निवडक धान्याचे पॅकिंग खरेदीकडे नागरिकांचा कल वाढला आहे. धान्य निवडण्याची, स्वच्छतेची कटकट नको म्हणून धान्यासह जीवनावश्यक वस्तू, किराणा मालही पॅकींगमधलाच घेणारा एक खास वर्ग तयार झाला आहे. किराणा सामानही जास्त प्रमाणात खरेदी केले जाते. किरकोळ मालाच्या तुलनेत पॅकिंग मालाची किंमत कमी असते. थोड्या फायद्यासाठी नागरिक जास्त पैसे गुंतवतात. मात्र, धान्यासह सर्वच मोठ्या पॅकिंगवर नेट-वेट नमूद करुन त्यावर दिलेल्या किंमतीला ते खरेदी केले जाते. ते वजन पॅकिंगवेळचे असते. ग्राहकापर्यंत पोहचेपर्यंत त्यात घट झालेली असते. त्यामुळे अनेकदा मालाचे नेट-वेट पॅकींग आणि प्रत्यक्ष वजनामध्ये तफावत आढळून येत असली तरी पॅकींगवेळीच निश्चित केलेली किंमत ग्राहकांना मोजावी लागते. त्यामुळे ग्राहकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे.
कमी वजनाच्या तुलनेत मोठ्या वजनाच्या पॅकींगमध्ये ग्राहकांचा जास्त तोटा होत आहे. मालाच्या नेट वेटच्या नावाखाली राजरोसपणे ग्राहकांची फसवणूक होत आहे. अलिकडे ग्राहकांमध्ये आपल्या हक्कांबाबत जागरुकता वाढली आहे. जेवढे वजन तेवढेच पैसे आकारले जावेत, अशी मागणी ग्राहकांमधून जोर धरु लागली आहे.