वाई : धोम धरणात 40 टक्के पाणी शिल्लक | पुढारी

वाई : धोम धरणात 40 टक्के पाणी शिल्लक

वाई ; पुढारी वृत्तसेवा : वातावरणातील बदलामुळे यावर्षी तापमानात प्रचंड वाढ झाल्याने पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. त्याचा परिणाम धरणातील पाण्यावर होत आहे. सध्या धोम धरणात केवळ 40 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. धोम धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साठला असल्याने धरणात पाणी साठवणूक क्षमता दिवसेंदिवस कमी होत आहे. गाळाचा प्रश्न गांभीर्याने न सोडवल्यास येत्या काळात पाणी साठ्यावर आणखी विपरित परिणाम होण्याची चिन्हे आहेत.

धोम धरणातील पाणी मोठ्या प्रमाणात दुष्काळी भागाला सोडले जाते. पाच तालुक्यातील शेतीसह पिण्याच्या पाण्याची मोठी मदार धोम धरणावर आहे. या धरणातून वर्षातून सहा आवर्तने सोडण्यात येतात. एका आवर्तनाचा कालावधी हा 25 दिवसांचा असतो. त्यामुळे वाई तालुक्यात शेतकर्‍यांना पाणी काटकसरीने वापरावे लागते. धरण उभारणी नंतर धरणातील गाळच काढला नसल्याने धरण तेरा टीएमसी असूनही उन्हाळ्यात मात्र धरणात पाण्याचा खडखडाट पहायला मिळतो. सध्या मे महिन्याच्या सुरुवातीलाच धरणात फक्त 40 टक्के पाणी साठा शिल्लक राहिल्याने पुढे दोन महिने पावसाने उघडीप दिल्यास वाई तालुक्यासह फलटण, कोरेगांव, खंडाळा या तालुक्यात पाणी टंचाईच्या झळा बसण्याची शक्यता आहे.

धोम धरण मे मध्ये काही प्रमाणात खाली होत असले तरीही जूनपर्यंत पाणीसाठा पुरेल एवढे नियोजन संबंधित विभागाकडून होण्याची नितांत गरज आहे. सध्या धरणात जे पाणी शिल्लक आहे ते जून अखेरपर्यंत पुरू शकेल परंतु दरवर्षी प्रमाणे पावसाने ओढ दिल्यास पाच तालुक्यांना शेतीच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू शकते. पिण्याच्या पाण्यासाठी चालू असलेल्या पाण्याच्या स्कीम धोक्यात येवू शकतात. वाई तालुक्यातही या वर्षी तापमानाची भीषणता एप्रिल मध्येच जाणवू लागली आहे. धोम धरणातील पाण्याची क्षमता कमी होत चालली असल्याने धोम धरणाचे भवितव्य पावसावरच अवलंबून आहे. वाईच्या पश्चिम भागात पाणी उषाशी असताना कोरड मात्र घशाला पडलेली असते. पाणी समोर असताना स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून दुसर्‍याचे संसार फुलवण्यात धन्यता मानली. त्या लाभार्थ्यांना धरणातील पाणी उचलण्याचा अधिकारच नाही. पाण्यासाठी काही किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. मुबलक पाणी असणार्‍या भागातच पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असते. पावसात पडणार्‍या पाण्याचे योग्य नियोजन होत नसल्याने उन्हाळ्यात त्याच्या झळा दरवर्षी बसतात. हे सर्व रोखावयाचे झाल्यास पाणी आडवा पाणी जिरवा हि योजना प्रभावीपणे राबवणे गरजेचे आहे.

यावर्षी तापमानात प्रचंड वाढ झाल्याने धरणातील पाणी झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे पाण्याचे आवर्तन यावेळेस न सोडण्यात आल्यास वाई भागातील बागायती पिकांना याचा फटका बसून उत्पन्नावर परिणाम होवू शकतो. – लक्ष्मण कळंबे, लाभार्थी शेतकरी

Back to top button