फायर ब्रँड अजितदादांचे सातार्‍यात ‘फायरिंग’ | पुढारी

फायर ब्रँड अजितदादांचे सातार्‍यात ‘फायरिंग’

सातारा : हरीष पाटणे राष्ट्रवादीचे फायर ब्रँड लिडर अजितदादा पवार सातार्‍यात आले की भलतेच रंगात येतात. आवडत्या ‘होमपिच’वरुन राज्यभरातील कुणालाही ठोकायला दादांना कमालीचे आवडते. सातार्‍यातील दोन दिवसांच्या दौर्‍यात त्यांनी अनेक ठिकाणी धमाकेदार ‘फायरिंग’ करत या जिल्ह्यावर अजूनही आपलीच ‘कमांड’ असल्याचे देहबोलीवरुन दाखवून दिले. कुणाला ठोसे, कुणाला इशारे, कुणावर कडवट टिका, जुने गौप्यस्फोट तर कुणाला गुदगुल्या करत अजितदादांनी दौरा गाजवला.

सातारा अजितदादा पवार यांचा अत्यंत आवडता जिल्हा. सातारा जिल्ह्याचे ते पालकमंत्री होते. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील गावागावांमध्ये अजितदादांचा थेट संपर्क आला होता. राज्यभरातील विरोधकांना इशारे द्यायचे असतील तर अजितदादा सातार्‍याचे पिचच निवडायचे. त्यामुळे आजही अजितदादांना सातारा हेच आपले ‘होमपिच’ वाटते. दि. 8 व 9 मे रोजीच्या सातारा जिल्ह्याच्या दौर्‍यात झालेल्या विविध कार्यक्रमांमध्ये व बैठकांमध्ये अजितदादांनी तुफान टोलेबाजी केली. त्याचवेळी त्यांच्यातील गावरान बाजही पुन्हा एकदा समोर आला.
सातारा तालुक्यातील वाढ्याच्या कार्यक्रमात किसन वीर कारखान्यातील विजयाचे अभिनंदन करताना अजितदादांनी मकरंद पाटलांनाही गुदगुल्या केल्या. ‘मकरंदआबा कारखाना निट सुरु झाला नाही ना, तर डोक्यावर राहिलेले केसही माझ्यासारखे निघून जातील आणि आमदारकीलाही काही खरं नाही!’ असे म्हणून त्यांनी मकरंद आबांना चिमटा काढला.

कारखान्याचे चेअरमन मदनदादा भोसले यांच्यावरही त्यांनी आगपाखड केली. स्वत:ला कारखाना चालवता आला नाही आणि दुसर्‍याच्या नावाने बोटे मोडत बसले अशा शब्दात त्यांनी मदनदादांचा समाचार घेतला. जनाधार असल्यावर लोक बदाबदा मते देतात, असे सांगताना त्यांनी बारामती मतदार संघातून दीड – दोन लाख मतांनी लोक कसे निवडून देतात याचा दाखलाच दिला. एक पठ्ठ्या माझ्याविरोधात उभा राहिला तर त्याचे डिपॉझिटच जप्त करुन त्याला परत पाठवला, असा टोलाही त्यांनी गोपीचंद पडळकर यांना लगावला. लोक भरभरुन मत देतात हे सांगताना त्यांना बाळासाहेब पाटील यांच्या अपक्ष उमेदवारीचीही आठवण आली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार व अजितदादा यांच्यामध्ये बाळासाहेबांच्या तिकिटावरुन कसे मतभेद झाले होते हेही त्यांनी उघड केले. त्यावेळच्या त्या प्रकरणाचा गौप्यस्फोट करताना अजितदादांनी गावरान भाषेत सांगितले की मी साहेबांना सांगत होतो बाळासाहेबांनाच तिकिट द्यावे लागेल. पण साहेब म्हणाले, खासदाराचं ऐकावं लागेल. (त्यावेळी राष्ट्रवादीचे खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले होते.) मग काय त्यांनी खासदारांच्या एकाला तिकिट दिलं, आम्ही मारला बाळासाहेबांना डोळा आणि पक्षाच्या तिकिटावर जेवढी मते पडली नाहीत तेवढी मते बाळासाहेबांना अपक्ष असताना पडली. लोकं डोक्यावर घेतात पण आणि डोक्यावरुन टाकतात पण. या आठवणीतून अजितदादांमधला
स्पष्ट वक्ता मात्र त्याचवेळी जनतेची नाडी ओळखून प्रसंगी शरद पवारांनाही तुमचा निर्णय चुकीचा होता हे सिद्ध करुन दाखवणारा नेता दिसला.

अजितदादांच्या फटकार्‍यातून राज ठाकरे सुटले नाहीत, नवनीत राणाही सुटल्या नाहीत. शरद पवार यांना जातीयवादी म्हटल्याबद्दल कमालीचे आक्रमक झालेल्या अजितदादांनी नामांतरापासूनचे दाखले देत राज ठाकरेंवर टीकास्त्र सोडले. उचलली जीभ लावली टाळ्याला असा आपला फेमस डायलॉगही त्यांनी मारला. पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे हे उगवतात. धार्मिक व जातीयवादी वातावरणामुळे या राज्यातील उद्योगधंदे बाहेर जाण्याचा धोका निर्माण झाला आहे असेही त्यांनी सांगितले. नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना दिलेल्या चॅलेंजची तर अजितदादांनी खिल्ली उडविली. आदित्य ठाकरे पाऊणलाख मतांनी निवडून आले. उद्धव ठाकरे यांच्या नावावर सरकार आले आहे आणि आपण कुणाला काय बोलतोय याचे भान राहिलेले नाही, अशा शब्दात त्यांनी नवनीत राणांचाही समाचार घेतला.
पार्थ पवार यांच्या वाढदिवसाचे बॅनर कोरेगावात काही दिवसांपूर्वी लागले होते. त्यावर बरीच चर्चा झाली होती. पार्थ पवार कोरेगावातून लढणार अशी अफवाही उठली होती. सातार्‍यातील पत्रकार परिषदेत पार्थ पवारांच्या अनुषंगाने प्रश्न विचारल्यावर अजितदादा भडकले. ‘धादांत खोटे आहे हे’असे त्यांनी आ. शशिकांत शिंदे यांच्यासमोरच जाहीर करून टाकले.

शिरूर लोकसभा मतदार संघात शिवाजीराव आढळराव हे उमेदवार असतील असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर राज्यात तिकिट वाटपाचे निर्णय राष्ट्रवादीत शरद पवार व शिवसेनेत उद्धव ठाकरे घेतात असे म्हणत त्यांनी राऊतांनाही टोला लगावला.

दिवसभराच्या बिझी शेड्यूल नंतरही रात्री उशिरा सव्वा अकरावाजेपर्यंत अजितदादांनी पत्रकार परिषद घेतली. किसन वीर कारखान्याच्या अनुषंगाने त्यांनी काही धडाकेबाज निर्णयही घेतले. अ‍ॅक्शन प्लॅन सुरू केला. दि. 9 मे ची पहाटही त्यांनी विकासकामांची पाहणी करत घालवली. सकाळी उठल्यापासूनच त्यांचे धाड धाड व खाड खाड सुरू झाले होते. नव्या विश्रामगृहाच्या कामाचीही त्यांनी पाहणी केली. रयत शिक्षण संस्था, शारदाबाई पवार आश्रम शाळा अशा कार्यक्रमांना हजेरी लावत शिवथरला किरण साबळे-पाटील यांना प्रोत्साहन द्यायलाही ते गेले. लोणंदला आ. मकरंद पाटील यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमातही त्यांनी यथेच्छ बॅटिंग केली.

दोन दिवस अजितदादांमधला धडाकेबाज, कामाला प्राधान्य देणारा, विरोधकांना सुनावणारा, स्वकियांना टपल्या मारणारा फायर ब्रँड नेता पुन्हा एकदा सातार्‍याला दिसला. अजितदादांच्या देह बोलीतून ‘ये ग्राउंड मेरा हैं, यही मेरा होम पीच हैं ’ असाच संदेश गेला.

दादा, तुम्ही मीडियावर का कावता?

अजितदादांचे भन्नाट उत्तर

सातार्‍याच्या पत्रकार परिषदेत अजितदादा नेहमीच मनातलं, दिलखुलास बोलतात. त्यामुळेच त्यांना सातार्‍यात प्रश्नही दिलखुलास विचारले जातात. दादा अलिकडे तुम्ही मीडियावर का कावत असता असा प्रश्न अजितदादांना विचारल्यावर त्यांनी हसूनच हात जोडले. अरे बाबानो, बातम्या दाखवताना आत्ताच गाडीत बसले, पुण्यात पोहोचले, औरंगाबादेत आले, कार्यक्रमस्थळी आले असे सारखे सारखे कशाला दाखवायचे? काय छापायचे, काय दाखवायचे हा तुमचा अधिकार आहे. आम्ही त्याचा आदरच करतो. मात्र, समाजात शांतता नांदावी, धार्मिक तेढ निर्माण होऊ नये, यासाठी तुमचीही जबाबदारी आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियाने ही जबाबदारी सांभाळली पाहिजे असे अजितदादा म्हणाले. त्याचवेळी त्यांनी राज्यभरातील पत्रकारांना सातार्‍यातील पत्रकारितेचे संदर्भही दिले. या जिल्ह्यातील अनेक पत्रकारांनी सकारात्मक पत्रकारिता केली आहे. आर. आर. आबा होते तेव्हा संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात राज्याचे पुरस्कार अनेकांनी मिळविलेले आहेत. ही सकारात्मकता संपूर्ण राज्यात मला अपेक्षित आहे, अशा शब्दात त्यांनी सातार्‍याच्या पत्रकारितेचा गौरव केला.

Back to top button