

सातारा : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे पुणे-बंगलोर महामार्गावर मध्यवर्ती बसस्थानक म्हणून ओळखल्या जाणार्या सातारा बसस्थानकातील चालक-वाहक विश्रांती कक्षामधील स्वच्छता गृहाची दूरवस्था झाल्याने संडास व बाथरूमची गटारगंगा रस्त्यावर आली आहे.
सातारा बसस्थानक सर्वात जास्त महसूल देणारे बसस्थानक म्हणून राज्यात ओेळख आहे. त्यामुळे सातारा बसस्थानकावर महामंडळाच्या अधिकार्यांचे सातत्याने लक्ष असते. मात्र गेल्या काही वर्षांपासून बसस्थानकातील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्याकडे वरिष्ठ अधिकार्यांचे दुर्लक्ष होत आहे. सध्या एसटी कर्मचार्यांचा संप सुमारे साडेपाच ते सहा महिने लांबला होता. आता कुठेतरी संप मिटला असून सर्व कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. तसेच लांब पल्ला, ग्रामीण मार्ग, रातराणी, शटलसेवा यासारख्या फेर्या सुरु झाल्या आहेत. दि.1 मे पासून सर्वच आगारातील एसटी वाहतूक पुर्णक्षमतेने सुरु झाली आहे. मात्र सातारा आगारातील चालक व वाहक विश्रांतीकक्षातील संडास व बाथरुम तुंबल्याने सर्वत्र गटारगंगा रस्त्यावर आली आहे. त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. सर्वत्र दुर्गंधीयुक्त पाणी वाहत असल्याने माशा व डासांचे साम्राज्य वाढले आहे.
चालक वाहकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. चालक व वाहकांच्या विश्रांती कक्षात जर असा प्रकार घडत असेल तर अन्य ठिकाणी काय अवस्था असेल. एसटी कर्मचार्यांच्या जीवाशी खेळण्याचाच प्रकार सातारा आगारात पहावयास मिळत आहे. सातारा आगारासह विभागीय कार्यालयातील वरिष्ठ अधिकार्यांनी या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देवून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी प्रवाशासह एसटी कर्मचार्यांमधून होत आहे.
सातारा आगारामध्ये स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्वच्छतेकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याने सर्वत्र कचरा अस्ताव्यस्त पहावयास मिळत आहे. बसस्थानकातील आसन व परिसरात तशीच अवस्था आहे. उन्हाळी हंगाम आणि प्रवाशांची होणारी गर्दी याचा विचार करुन अधिकार्यांनी गांभीर्याने लक्ष देवून परिसराची स्वच्छता कर्मचार्याकडून करुन घेतली पाहिजे.