सातारा : एस.टी. ची चाके अखेर मार्गावर | पुढारी

सातारा : एस.टी. ची चाके अखेर मार्गावर

सातारा; पुढारी वृत्तसेवा : गेल्या दोन वर्षांत कोरोना, कर्मचार्‍यांचा संप अशा घटनांमुळे एसटीला अवकळा आली होती. मात्र, आता परिस्थिती बदलू लागली आहे. कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागल्यानंतर तसेच गेल्या सहा महिन्यांपासून एस.टी संपात सहभागी असणारे जिल्ह्यातील सर्व कर्मचारी कामावर हजर झाल्याने बस व प्रवाशांनी जिल्ह्यातील बसस्थानके फुलून गेल्याचे चित्र आहे. एसटी वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याने उत्पन्नातही वाढ होत असून हळूहळू एस.टी पूर्वपदावर येत आहे.

कोरोनानंतर एसटीची चाके रस्त्यावर येत असल्याची स्थिती असतानाच नोव्हेंबर महिन्यात अचानक राज्यभरातील एसटी कर्मचार्‍यांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला. या संपातून तोडगा काढत कर्मचार्‍यांना 41 टक्के पगारवाढ केल्याचे राज्य शासनाने जाहीर केले. मात्र, काही संघटनांनी विलीनीकरणाच्या मुद्यावर ठाम राहत आंदोलन सुरूच ठेवले होते. त्यावर न्यायालयाने कर्मचार्‍यांना 22 एप्रिलपर्यंत कामावर हजर होण्याचे आदेश दिले होते. बडतर्फ कर्मचार्‍यांना विभागीय कार्यालयात सक्त ताकीद देऊन हजर होण्यास सांगितले होते. त्यामुळे जिल्ह्यातील 11 आगारांतील सर्वच्या सर्व कर्मचारी हजर झाले आहेत. सद्य:स्थितीत आता जिल्ह्यातून राज्यभरात एसटीच्या मोठ्या प्रमाणात फेर्‍या सुरू झाल्याने उत्पन्नातही वाढ होत आहे.

जिल्ह्यात ग्रामीण भागात सुरू असणार्‍या लालपरीसह इतर ठिकाणी शिवशाही, हिरकणी या बसही जिल्ह्यातील विविध आगारांतून सुरू झाल्या आहेत. गेल्या 15 दिवसांपासून एसटीच्या फेर्‍या वाढल्या असून दिवसाला सरासरी 1700 हून अधिक फेर्‍या सुरू झाल्या आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यातील अकरा आगारांत तीन हजार 410 कर्मचारी कामावर हजर झाल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली आहे.

ऑनलाईन आरक्षण सुरू

संप काळात कर्मचारी संख्या अपुरी असल्याने लांब पल्ल्यांच्या एसटीचे आरक्षण बंद ठेवण्यात आले होते. मात्र, सद्य:स्थितीत सर्वच कर्मचारी हजर झाल्याने सातारा-स्वारगेटसह इतर काही लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे ऑनलाईन आरक्षण सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

Back to top button