सातारा : महागाईचा भोंगा थांबेना; गॅस दरवाढ सोसवेना | पुढारी

सातारा : महागाईचा भोंगा थांबेना; गॅस दरवाढ सोसवेना

सातारा; पुढारी वृत्तसेवा : मागील काही दिवसांपासून जीवनावश्यक वस्तू इंधनासह सर्वच गोष्टींसाठी महागाईच्या झळा बसू लागल्या आहेत. त्यातच आता शनिवार दि. 7 मे रोजीपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ झाली आहे. पुन्हा गॅसदरवाढीचा भडका उडाल्याने घरगुती गॅस दराने हजारी पार केली आहे. महिन्याचे बजेट सांभाळून संसाराचा गाडा ओढताना गृहिणींचा जीव मेटाकुटीला आला आहे.

मागील दोन महिन्यांपासून महागाईने उच्चांक गाठला आहे. जीवनावश्यक वस्तू व खाद्यतेलाच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. ही दरवाढ दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचं जगणं मुश्कील होत आहे. त्यातच मुलांना शाळेला सुट्ट्या लागल्याने घरातच कल्ला सुरु आहे. खाण्याच्या फर्माईश वाढू लागल्या आहेत. कडक उन्ह आणि मसाल्यांचा अतिरेक यामुळे बाहेरचं खाल्ल्यास आजारांना आमंत्रण मिळत आहे. अशात पाल्याचे आरोग्य सांभाळण्यासाठी महिला वर्गाची दमछाक होत आहे. त्यातच मागील काही दिवसांपासून रशिया-युक्रेन युध्दाच्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तू व खाद्यतेलाच्या किंमती भरमसाठ वाढल्या आहेत. 1 मेलाच व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीमध्ये 104 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. आता घरगुती गॅसच्या दरात शनिवारपासून 50 रुपयांनी वाढ झाली आहे. 956 रुपयांना मिळणार्‍या गॅस सिलेंडरने आता हजारी पार केली आहे. त्यामुळे प्रवासासह घरपोच गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांना 1015 ते 1025 रुपये मोजावे लागणार आहेत. वर्षभरात वारंवार घरगुती गॅसच्या दरात वाढ झाली आहे. जून 2021 मध्ये पेट्रोलियम कंपन्यांनी तब्बल सहा वेळा एलपीजी गॅस दरात वाढ केल्यामुळे ग्राहकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. तेव्हापासून महिन्याच्या एक तारखेला गॅसचे दर निश्चित केले जातात. मागील दोन महिन्यांपासून महिन्यातील कोणत्याही तारखेला अचानक गॅसची दरवाढ केली जात आहे. महागाईशी दोन हात करत असताना घरगुती वापराच्या सिलेंडरच्या दरवाढीमुळे गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडणार आहे. महागाईच्या तुलनेत घरातील उत्पन्न मात्र जैसे थे राहत असल्याने आर्थिक बजेट व कुटुंबाचे आरोग्य सांभाळताना गृहिणींचा जीव मेटाकुटीस आला आहे. सध्या सर्वत्र राजकीय भोंगे वाजत आहेत. मात्र, या महागाईच्या भोंग्याकडे कोणाचेच लक्ष नसल्याने सर्वसामान्यांना जगणे मुश्किल झाले आहे.

सरपणासाठी वृक्षांवर कुर्‍हाड…

ग्रामीण भागतील शेतकरी वर्ग तसेच कष्टकरी वर्गाकडून मागील काही महिन्यांपासून स्वयंपाकासाठी चुलीचा वापर वाढला आहे. तसेच उज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांचीही एका महिन्याच्या सिलेंडरसाठी हजार रुपये खर्च करण्याची ऐपत नसल्याने माळरानातून सरपण गोळा करुन त्यावर स्वयंपाक करण्याकडे या वर्गाचा कल वाढला आहे. बर्‍याचदा सरपणासाठी ओढे, नदीकाठच्या वृक्षांवर कुर्‍हाड पडू लागली आहे. अन्नाची भूक क्षमवण्यासाठी व दोनवेळच्या स्वयंपाकासाठी वृक्षसंवर्धन करणारे हातच वृक्षतोडीसाठी सरसावत आहेत.

गॅस दरवाढीचा आलेख

महिना गॅस दर-

  • जानेवारी 2021- 699
  • 9 फेब्रुवारी 2021- 750
  • 15 फेब्रुवारी 2021- 774
  • 25 फेब्रुवारी 2021- 799
  • मार्च 2021- 825
  • जून 2021- 875
  • ऑक्टोबर 2021- 904.50
  • 22 मार्च 2022- 954.50
  • 7 मे2022- 1055

Back to top button