महाबळेश्वर : बॅबिंग्टन पॉइंट जंगलात वणवा | पुढारी

महाबळेश्वर : बॅबिंग्टन पॉइंट जंगलात वणवा

महाबळेश्वर : पुढारी वृत्तसेवा

महाबळेश्वर बाजारपेठेपासून अंदाजे 3 किमी अंतरावर असलेल्या प्रसिद्ध बॅबिंग्टन पॉइंटनजीकच्या जंगलात गुरुवारी सायंकाळी अज्ञात व्यक्तीने लावलेल्या वणव्यामुळे निसर्गसंपदेची मोठी हानी झाली. या वणव्यामुळे सर्वत्र धुराचे लोट पहावयास मिळाले.

बॅबिंग्टन पॉइंट परिसरातील जंगलात वणवा लागल्याची माहिती येथील सह्याद्री प्रोटेक्टर्स व फळणे वस्तीतील पर्यावरणप्रेमी युवकांना समजताच या युवकांनी वणवा आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु केले. चार ते पाच तासांच्या परिश्रमानंतर हा वणवा आटोक्यात आला. फळणे वस्तीतील पर्यावरणप्रेमी विजय फळणे,अभिषेक जाधव,सह्याद्री प्रोटेक्टर्सचे सत्यम फळणे, सन्मय फळणे, सागर फळणे, अभिषेक जाधव, संदेश भिसे, आशिष पवार, शुभम केळगणे आदींनी अथक परिश्रम घेतले.

अज्ञाताने लावलेल्या या वणव्यात झाडे, गवत तसेच पक्ष्यांची घरटीही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या घटनेमुळे पर्यावरणप्रेमींमधून नाराजी व्यक्त होत आहे. जंगलात सातत्याने होणार्‍या बेसुमार वृक्षतोडीमुळे वन्यप्राण्यांचा अधिवास व अनेक वन्यप्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या वणव्यात अनेक कृमी-किटक नष्ट होत असल्याने त्यांच्या प्रजाती नष्ट होत आहेत, अशी माहिती काही निसर्गप्रेमींनी दिली.

Back to top button