कराड : इच्छुकांची पुन्हा बाशिंग बांधण्याची तयारी | पुढारी

कराड : इच्छुकांची पुन्हा बाशिंग बांधण्याची तयारी

कराड; प्रतिभा राजे : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे गेल्या पाच महिन्यांपासून निवडणुका कधी लागणार याची प्रतीक्षा करत असलेल्या इच्छुक उमेदवारांनी पुन्हा बाशिंग बांधण्याची तयारी सुरू केली आहे. निवडणूक कार्यक्रमाबाबत अनेकदा संभ्रम निर्माण झाल्याने घोड्यावर बसून अनेकदा खाली उतरावे लागलेल्या इच्छुकांमध्ये उलाघाल सुरू असून आता राजकीय घडामोडींनाही वेग येईल.
दरम्यान, ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होण्याची चिन्हे असल्याने ओबीसीमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.

26 डिसेंबर 2021 रोजी कराड पालिकेच्या सत्ताधार्‍यांचा कार्यकाल संपला. त्यानंतर पालिकेवर प्रशासन लागू झाले. त्यामुळे कार्यकाल संपलेले मेहेरबान अस्वस्थ झाले तर इच्छुक निवडणुकांच्या तयारीला लागले होते. प्रभाग रचनेचे आराखडे, गटतट, आघाडीच्या आराखड्यांच्या चर्चा सुरू होत्या. मात्र ओबीसी आरक्षणामुळे निवडणुकांना मुहूर्त लागत नसल्याने बाशिंग बांधून तयार असणार्‍या इच्छुकांना अनेकदा बाशिंग सोडावे लागले. अनेक नवीन हौशी इच्छुकांनी तर कामधंदा सोडून केवळ निवडणूक हेच टार्गेट ठेवून राजकीय गटांकडे दररोज हजेरी लावून चाचपणी केली होती. त्यातच निवडणुका दोन महिन्यांत लागतील, तीन महिन्यांत लागतील असे म्हणता म्हणता दिवस पुढे जात असल्याने आता वर्षभर निवडणूका होत नाहीत असे समजून काही इच्छुकांनी आपआपला कामधंदा सुरू केला. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकासाठीचा कार्यक्रम दोन आठवड्यांत जाहीर करा असा आदेश काल दिला. त्यामुळे पुन्हा इच्छुकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

गेल्या वर्षभरापासून अनेक सण, उत्सवात एकमेकांना शुभेच्छा देऊन मतदारांशी जवळीकता साधण्यात अनेकजण प्रयत्न करत आहेत. दरम्यान, अनेकांचे मनसुबे आरक्षणावर अवलंबून आहेत. तर कशाही होऊ देत पण निवडणुका होऊदेत या मानसिकतेत अनेक इच्छुक आहेत.

आरक्षणाविनाच होणार निवडणुका?

इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) आरक्षणासाठी राज्य सरकारने ट्रिपल टेस्टच्या चाचणी अद्याप पालन न केल्याने या निवडणुका आरक्षणाविना होणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणासाठी पुढे ढकललेल्या निवडणूक कार्यक्रम लवकरच लागण्याच्या शक्यता निर्माण झाल्या आहेत.

Back to top button