कराड : जस्साने ‘पुट्टी’वर सुदेशकुमारला दाखविले अस्मान | पुढारी

कराड : जस्साने ‘पुट्टी’वर सुदेशकुमारला दाखविले अस्मान

कराड; पुढारी वृत्तसेवा : मन आणि मनगटाच्या जोरावर देशभरातील अनेक मल्लांना चितपट करणारा मल्ल जस्सा पट्टी याच्या आक्रमणापुढे भारत केसरी सुदेशकुमारचा टिकाव लागला नाही. केवळ दहाव्याच मिनिटाला जस्सा पट्टी याने पुट्टी डावावर सुदेशकुमारला अस्मान दाखवत सुर्ली येथील नावजलेले कुस्ती मैदान मारले. यावेळी कुस्ती शौकीनांनी एकच जल्लोष केला.

दरम्यान, यावेळी महिला कुस्ती पट्टू अंजली वेताळ हिची कुस्तीतील चमक, चपळाई व डावप्रतिडाव पाहुन खा. श्रीनिवास पाटील यांनी तिच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली.

सुर्ली (ता. कराड)येथील पिराच्या यात्रेनिमित्त कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम क्रमांकाची कुस्ती जस्सा पट्टी विरुद्ध सुदेशकुमार अशी लावण्यात आली. जस्सा पट्टी याने सलामीलाच समोरुन चाट मारीत आपले इरादे स्पष्ट केले. भक्कम बचाव करून सुदेशकुमारने जस्सा पट्टी याचे प्रयत्न हाणून पाडले. मात्र बगलडूब करून कब्ब्जा घेतलेल्या जस्साची डोळ्याचे पारणे फेडणारी पुट्टी रोखण्याचा सुदेशचा प्रयत्न फसल्याने त्याला पराभवाची धूळ पचवावी लागली. मैदानात सैदापूरच्या रणजित राजमाने याने सयाजी जाधवला पराभूत केले. कोपर्डेच्या गौरव हजारे पुढे दिल्लीच्या मल्लाची डाळ शिजली नाही. सुशांत माने याने नितीन मानेवर चुरशीच्या लढतीत मात केली. बाबू सर्वगोड समीर पटेलला भारी ठरला. सिध्देश साळुंखे विरुद्ध भालत पवार ही कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली.
मैदानात मुल्ला (वाघेरी), साहिल चव्हाण, रोहित भोसले, विश्वजीत बानगे (कडेगाव), विक्रम माने (सुर्ली), करण भोसले (कोल्हापूर), प्रणव पाटील, सुशांत टेंगरे, शिवम डोंब, अथर्व वेताळ, आर्यन भोगे, इंझमाम पटेल, आदित्य फडतरे (सैदापूर), यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी मल्लांवर विजय मिळवून वाहवा मिळवली. रामदास गायकवाड यांनी केलेल्या समालोचनाने प्रेक्षकांची मने जिंकली.

यावेळी खा. श्रीनिवास पाटील, माजी आ. आनंदराव पाटील, वैभव देसाई, अमोल डांगे, कमलाकर चौगुले, पै. धनाजी पाटील, शिवाजीराव सर्वगोड, धनाजी शिंदे, राजू जाधव, महेश भोसले, हिंदकेसरी संतोष वेताळ, नवनाथ पाटील, सरपंच दत्तात्रय वेताळ, अमोल भोगे, प्रविण वेताळ, मनोज माने, निसार मुल्ला, संभाजी माने आदी उपस्थित होते.

अंजलीने कुस्तीबरोबरच शौकिनांची मने जिंकली

याच मैदानात सुर्ली गावची कन्या अंजली वेताळ विरुद्ध संतोष जाधव मसूर यांच्यातील अटीतटीची लढत चांगलीच रंगली. मात्र निर्णायक क्षणी अंजलीने समोरून झोळी बांधून संतोषला पराभवाची धूळ चारली. मुलाबरोबर लढताना रणरागिणी अंजलीने दाखवलेली जिगर आणि जिद्द पाहून भारावलेल्या खा. श्रीनिवास पाटील यांनी स्वतःच्या डोक्यावरील फेटा अंजलीला बांधून तिच्या लढाऊ वृत्तीचे कौतुक केले.

Back to top button