सातारा : सिव्हीलच्या 10 डॉक्टरांचा रजेसाठी अर्ज | पुढारी

सातारा : सिव्हीलच्या 10 डॉक्टरांचा रजेसाठी अर्ज

सातारा ; पुढारी वृत्तसेवा : कोरोनाच्या काळातील शिनवटा घालवण्यासाठी डॉक्टर सज्ज झाले असून सिव्हीलमधील 32 पैकी 10 डॉक्टरांनी मे महिन्यातील सुट्टीसाठी अर्ज केले आहेत. हे डॉक्टर रजेवर गेल्यास सिव्हीलच्या कारभारात विस्कळीतपणा येण्याची शक्यता आहे. रूग्णसेवेवर कोणताही परिणाम होवू नये यासाठी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी याचे नियोजन करणे आवश्यक झाले आहे.

कोरोनामध्ये सिव्हीलमधील अनेक डॉक्टरांना 24 तास सेवेसाठी तत्पर हजर रहावे लागत होते. त्यामुळे त्या कालावधीत त्यांच्या हक्कांच्या सुट्ट्यांवरही गंडांतर आले. मात्र, आता कोरोनाची लाट पूर्णपणे ओसरली असल्यामुळे थोडी उसंत म्हणून डॉक्टरांनी मे महिन्यात पर्यटनाचा बेत आखला आहे. यासाठी अनेकांनी जिल्हा शल्यचिकीत्सकांकडे अर्जही केले आहेत.

जिल्हा शासकीय रुग्णालयात एकूण 32 डॉक्टर व 268 इतर कर्मचारी वर्ग कार्यरत आहेत. यातील दहा डॉक्टर सुट्टीवर गेल्यानंतर इतर डॉक्टरांवर ताण येणार आहे. पुढील दोन आठवड्यांमध्ये रजा मागणार्‍यांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. सिव्हिलमध्ये मनुष्यबळ कमी आहे. रोज हजारो रुग्ण तपासणीसाठी येत असतात. या परिस्थितीत निम्मे डॉक्टर सुट्टीवर गेल्यानंतर रूग्णसेवेवर त्याचा परिणाम होणार आहे. इतर डॉक्टरांवर याचा ताण वाढणार आहे.

सिव्हिलमधील घडी न विस्कटता, नियोजन करण्याची गरज आहे. चार दिवस दोन डॉक्टर सुट्टीवर गेले. तर त्यांची जागा दुसर्‍या दोन डॉक्टरांनी पहायची. त्यामुळे इतर डॉक्टरांवर फारसा ताण येणार नाही. शिवाय रुग्णांच्या तपासणीमध्येही कोणताही व्यत्यय येणार नाही याचाही विचार केला गेला असल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले.

आवश्यक शस्ञक्रिया होणारच

मे महिन्याच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी डॉक्टर सुट्टीवर गेले तरी आवश्यक शस्त्रक्रिया होणार आहेत. मोतीबिंदू, पेंडिक्स, हर्निया, फ्रॅक्चर यासारख्या शस्त्रक्रिया प्राधान्याने केल्या जाणार आहेत. त्यामुळे रुग्णांनी चिंता करू नये, असे आवाहन सिव्हिल प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Back to top button