सातारा : पीआरसी पुन्हा येणार; झेडपीला धाकधूक | पुढारी

सातारा : पीआरसी पुन्हा येणार; झेडपीला धाकधूक

सातारा ; प्रविण शिंगटे : राज्य शासनाच्या महाराष्ट्र विधानमंडळाची पंचायत राज समिती (पीआरसी) मे ते जून या कालावधीत पुन्हा सातारा जिल्हा परिषदेला भेट देणार असल्याने झेडपीत धाकधुकीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुमारे तीन वर्षापूर्वी झालेल्या पीआरसीच्या दौर्‍यात बरीच झाडाझडती झाली होती. समितीने काही विभागाच्या कामकाजावर ताशेरे ओढले होते. या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आहेत. दरम्यान, पीआरसीच्या संभाव्य दौर्‍यामुळे झेडपीतील अधिकारी, कर्मचारी कमालीचे अलर्ट झाले आहेत.

पंचायत राज समितीचा दौरा

सातारा जिल्हा परिषदेमध्ये एप्रिल 2018 मध्ये झाला होता. त्यावेळी समितीने तीन दिवसाच्या दौर्‍यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, शाळा, अंगणवाड्या व प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी देवून अधिकारी व कर्मचार्‍यांची झाडाझडती घेतली होती. पुन्हा पंचायत राज समितीचा दौरा मे व जूनमध्ये होणार आहे. त्याबाबतचे पत्र विधानमंडळ सचिवालयाचे उपसचिव विलास आठवले यांनी दिले आहे.

पंचायत राज समिती सन 2016-2017 व सन 2017-2018 च्या लेखा परीक्षा पुनर्विलोकन अहवाल तसेच सन 2018-19 च्या वार्षिक प्रशासन अहवालाच्या संदर्भात सातारा जिल्हा परिषदेला भेट देवून मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर सर्व संबंधित अधिकार्‍यांची साक्ष मे व जून 2022 या कालावधीत घेण्यात येणार आहे. तसेच 2016-17 व सन 2017-18 च्या लेखा परीक्षा पुनर्विलोकन अहवालातील परिच्छेदांच्या माहिती, तसेच सन 2018-2019 च्या वार्षिक प्रशासन अहवालावरील प्रश्नावली क्रमांक 1 व 2 बाबतची माहिती प्रश्न उत्तरेे स्वरुपात तयार करण्यात यावी ही माहिती तात्काळ महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाकडे पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे ही समिती जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पंचायत समिती, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत यासह विविध विभागांना भेट देवून पाहणी करणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे सर्वच विभाग अलर्ट झाले आहेत. पंचायत राज समिती दौर्‍यांच्या अनुषंगाने महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाकडून आलेले पत्र जिल्हा परिषदेच्या सर्व विभागाला देण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील सर्व विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांची माहिती पुन्हा नव्याने गोळा करण्यासाठी लगबग सुरु झाली आहे.

सर्वच विभागातील अधिकारी व कर्मचारी सकाळपासूनच आपापल्या विभागातील माहिती गोळा करण्यात व्यस्त आहेत. ज्या-ज्या ठिकाणी त्रुटी दाखवण्यात आल्या होत्या. त्या त्रुटींचे निरसन करुन त्याची पुर्तताही केली जात आहे. दोन महिन्यात कधीही पंचायत राज समितीचा दौरा जिल्ह्यात होण्याची शक्यता असल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात सर्वच अधिकारी व कर्मचार्‍यांचा घामटा निघणार आहे.

ऐन उन्हाळ्यात अधिकारी व कर्मचार्‍यांचा घामटा

नोव्हेंबर महिन्यात येणार्‍या पंचायत राज समितीचा दौरा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द झाला होता. त्यामुळे अधिकारी व कर्मचार्‍यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला होता. मात्र पंचायत राज समिती मे ते जून या कालावधीत सातारा जिल्हा परिषदेला भेट देणार आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचार्‍यांना पुन्हा नव्याने माहिती गोळा करण्याची वेळ आली आहे. विविध मुद्यांची माहिती गोळा करण्यासाठी ऐन उन्हाळ्यात अधिकारी व कर्मचार्‍यांचा घाम निघणार आहे. प्रशासनामार्फत सर्वच खातेप्रमुखांना पंचायत राज समिती दौर्‍यांच्या अनुषंगाने आपापल्या विभागाची परिपूर्ण माहिती सज्ज ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Back to top button