MPSC : राज्यसेवा परीक्षेत सातार्‍याचा डंका | पुढारी

MPSC : राज्यसेवा परीक्षेत सातार्‍याचा डंका

सातारा : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेत सातारा जिल्ह्यातील 13 हून अधिक विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. त्यामुळे सातारा जिल्ह्याचा राज्यात पुन्हा एकदा डंका वाजला.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने दि. 21 मार्च 2021 मध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा घेण्यात आली होती. त्यातून पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची डिसेंबर 2021 मध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षा घेण्यात आली. त्यातील पात्र विद्यार्थ्यांच्या मुलाखती दि. 29 एप्रिलपर्यंत घेण्यात आल्या. मुलाखतीनंतर अवघ्या काही तासांमध्ये राज्यसेवा परीक्षेची गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये सातारा जिल्ह्यातील रुपाली माने, शुभम जाधव, अजिंक्य जाधव, अमोल कोरे, वैभव धायगुडे यांच्यासह 13हून अधिक विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.

दरम्यान सरडे ता. फलटण येथील वैभव बाजीराव धायगुडे याने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत राज्यात 14वा क्रमांक पटकावला. वैभव धायगुडेचे प्राथमिक शिक्षण कमला निंबकर बालभवन फलटण येथे झाले तर माध्यमिक शिक्षण मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे झाले. अभियांत्रिकी शिक्षण पुणे येथील मॉडर्न कॉलेज येथे झाले. त्याचे वडील निवृत्त शिक्षक असून आई गृहिणी आहे. या यशाबद्दल त्याचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

Back to top button