सातारा : कोयना धरण परिसरात पाऊस थांबल्याने सहा वक्री दरवाजे बंद | पुढारी

सातारा : कोयना धरण परिसरात पाऊस थांबल्याने सहा वक्री दरवाजे बंद

पाटण : पुढारी वृत्तसेवा : कोयना धरण अंतर्गत विभागात पावसाचा जोर मंदावल्याने व धरणातील पाणी आवकही त्याच पटीत घटली आहे. यामुळे धरणातील सध्याचा पाणीसाठा व अद्यापही पाणी सामावून घेण्याची क्षमता लक्षात घेता, बुधवारी सकाळी नऊ वाजता धरणाचे सहा वक्री दरवाजे पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. विनावापर सोडण्यात येणारे पाणी आता बंद करण्यात आलेले आहे. आता केवळ धरण पायथा वीजगृहातील दोन जनित्राद्वारे वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद २१०० क्युसेक इतकेच पाणी सध्या पूर्वेकडे कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात महाबळेश्वर आणि नवजा परिसरात 19 जुलैपासून मुसळधार पाऊस सुरू होता. 23 जुलैला धरण पाणलोट क्षेत्रात विक्रमी पावसाची नोंद झाली होती. त्यामुळेच धरणात एकाच दिवशी 16.41 टीएमसी पाण्याची आवक झाली होती. 1961 साली धरणाच्या निर्मितीनंतर प्रथमच 23 जुलै 2021 रोजी धरणात इतक्या मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक झाली होती.

त्यामुळेच कोयना धरणाचे वक्री दरवाजे उघडण्यात येऊन मागील बारा दिवसापासून कोयना नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता.

धरणातील पाणीसाठा 90 टीएमसीहून अधिक झाला होता आणि धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी

मागील काही दिवसात पावसाचा जोर ओसरल्यानंतरही धरणाच्या 6 वक्री दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू होता.

मात्र आता पावसाचा जोर जवळपास ओसरला असून धरणातील पाणीसाठा ८५.८८ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.

धरणात होणारी पाण्याची आवक आणि पावसाचा ओसरलेला जोर पाहता बुधवारी सकाळी धरणाचे सहा वक्री दरवाजे बंद करण्यात आले आहेत.

सद्यस्थितीत धरणातील पाणी उंची २१४७.९ फूट इतकी झाली असून धरणात सध्या प्रतिसेकंद सरासरी १९ हजार २५० क्युसेक इतक्‍या पाण्याची आवक होत आहे.

धरणाच्या सहा दरवाजातून दीड फुटाने प्रतिसेकंद ७ हजार ८२५ क्युसेक सोडण्यात येणारे पाणी आता पूर्णपणे बंद करण्यात आले आहे.

यापुढे पावसाचा जोर वाढला आणि धरणातील पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली तर त्यानंतरच धरणाच्या दरवाज्यातून विनावापर पाणी सोडण्याचा विचार केला जाईल.

अशी माहिती धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे .

Back to top button