प्रतापगडावर पाणी टंचाई | पुढारी

प्रतापगडावर पाणी टंचाई

प्रतापगड : पुढारी वृत्तसेवा

किल्ले प्रतापगडावर सध्या स्थानिक ग्रामस्थ तसेच पर्यटकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. दि. 22 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे प्रतापगड पाणी पुरवठा योजनेचे प्रचंड नुकसान झाले आहे. याबाबत ग्रामस्थांनी सतत पाठपुरावा केल्यानंतर जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तात्काळ लक्ष घालून 4 महिन्यांपूर्वी 10 लक्ष 50 हजार रुपये मंजूर करुन या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण केली. मात्र, पाणीपुरवठा अधिकार्‍याच्या दुर्लक्षामुळे या पाणीपुरवठा योजनेची परिस्थिती गंभीर आहे. सतत होणारी पाणी गळती, सतत नादुरुस्त होणारे पाण्याचे पंप, लाईट बिल न भरल्याने विद्युत पुरवठा बंद होणे यामुळे नागरिकांना अनियमित पाणी पुरवठा होत आहे.

आता उन्हाळी हंगाम सुरु होत असूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. किल्ले प्रतापगडावर या काळात लाखो पर्यटक व शिवभक्त भेट देतात.येणारे पर्यटक तसेच शिवभक्तांना लागणारे पाणी कसे पुरवावे? हा प्रश्न स्थानिक ग्रामस्थांना पडला आहे. या किल्ल्यावर असणार्‍या चारही तलावातील पाणी पिण्यासाठी किंवा नियमित वापरासाठी योग्य नसल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे. तरी संबंधीत पाणीपुरवठा विभागाने तात्काळ लक्ष घालून येथील पाणी टंचाई दूर करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

Back to top button