वाई : किसनवीर सभासदांच्याच मालकीचा राहिल : आ. मकरंद पाटील | पुढारी

वाई : किसनवीर सभासदांच्याच मालकीचा राहिल : आ. मकरंद पाटील

वाई : पुढारी वृत्तसेवा

किसनवीर सहकारी साखर कारखाना हा सभासदांच्या मालकीचाच राहणार आहे. त्याचे खाजगीकरण करून तो पवार कुटुंबियांना देण्याचा अपप्रचार सध्या चालू आहे. त्यांच्या या धादांत खोटे बोलण्याला सभासद शेतकरी कदापि बळी पडणार नाहीत. भ्रष्टाचारी विद्यमान अध्यक्षांनी शेतकरी सभासदांची दिशाभूल करण्यासाठी धादांत खोटे बोलण्याचे धंदे बंद करावेत. पाप तुम्ही केले आहे आणि बोट आमच्याकडे कशाला दाखवत आहात? अशी खरमरीत टीका आ. मकरंद पाटील यांनी केली.

वाईत येथील आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, आ. शशिकांत शिंदे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ, राजेंद्रशेठ राजपुरे, नितीन भुरगुडे-पाटील, प्रतापराव पवार, महादेव मस्कर, कुमार बाबर, संदीप पोळ, अनिल सावंत, अनिल जगताप, शशिकांत पवार, पै.विक्रांत डोंगरे, सत्यजित वीर, मंगेश धुमाळ, उमेदवारांमध्ये रामदास संपतराव गाढवे, किरण राजाराम काळोखे, प्रमोद भानुदास शिंदे, रामदास महादेव इथापे, प्रकाश लक्ष्मण धुरगुडे, शशिकांत मदनराव पिसाळ, दिलीप आनंदराव पिसाळ, हिंदुराव आनंदराव तरडे, संदीप प्रल्हाद चव्हाण, बाळासाहेब शिवाजी कदम, सचिन हंबीरराव जाधव, सचिन घनशाम साळुंखे, ललित ज्योतीराम मुळीक, संजय अरविंद फाळके, सुशीला भगवानराव जाधव, सरला श्रीकांत वीर, राखीव संजय निवृत्ती कांबळे, हणमंत बाळासाहेब चवरे, शिवाजीराव बंडू जमदाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

आ. पाटील म्हणाले, किसनवीर सहकारी साखर कारखाना हा जिल्ह्यातील सहकाराचा मानबिंदू होता. किसनवीर आबांनी मोठ्या दूरदृष्टीने शेतकर्‍यांच्या हितासाठी चालू केला. तात्यांनी कारखाना सोडला तेव्हा अवघे साडेसहा कोटीचे नियमित कर्ज होते तर 7 लाख 30 हजार साखरेची पोती शिल्लक होती. शेतकर्‍यांचे 55 हजार कोटी देणं बाकी असताना तसेच कामगारांचे दोन वर्षे पगार नाहीत, तरी पाटील बंधुनी कारखाना चालविण्यासाठी लागणारी बँकेची मदत मिळू दिली नाही, अशी खोटी वल्गना करून शेतकरी सभासदांची दिशाभूल करून विरोधक निवडणूक लढवीत आहेत.

आपल्या पापाचे खापर आमच्या डोक्यावर फोडायचा प्रयत्न चालू आहे. तिन्ही कारखाने सुरु करण्याचा यक्ष प्रश्न आहे. आपल्याला मार्ग काढावा लागेल. निवडणूक जिंकल्यावर मोठी जबाबदारी आहे. थकहमी उभी करुन कारखाना चालू करु, जिवाच रान करू, किसनवीर बचाव शेतकरी पॅनलने सक्षम उमेदवार दिले आहेत. त्यांनाच निवडून देवून सत्ताधार्‍यांवरील राग व्यक्त करा, असे आवाहनही आ. पाटील यांनी केले.

नितीन पाटील म्हणाले, सद्यस्थितीत शेतकर्‍यांची अवस्था बिकट आहे. मेळाव्याला लोकांचा उस्फुर्त प्रतिसाद पाहता कारखाना ताब्यात घेण्याची सर्वसामान्याची तीव्र इच्छा आहे. शरद पवार कृषी मंत्री असताना त्यांच्या धोरणामुळे साखरेचा भाव दोन हजारापर्यंत दिला त्यावेळी शिल्लक साखरेचा फायदा विरोधकांना झाला. त्यावेळी कारखान्यावर फारसे कर्ज नव्हते. मदन भोसले यांनी साखर निर्यातीमध्ये साडेदहा कोटींचा घोटाळा केला. तुम्ही केलेल्या इतर प्रकल्पाचा शेतकर्‍यांना काही फायदा झाला नाही. ऑडिट न करता अहवाल छापला. असे अनेक गैरव्यवहार त्यांनी केले. खंडाळा कारखान्यावर 266 कोटींची देणी आहेत असेही ते म्हणाले.

नितीन पाटील म्हणाले, आमचं मदन भोसलेंशी कसलेही साटेलोटे नाही. तालुक्यातील ऊस तुटावा म्हणून जरंडेश्वर व शरयू यांच्या मागे लागून टोळ्या आणल्या. जिल्ह्यातील कारखाने बंद होण्याच्या वेळेस किसनवीरमध्ये मोळी टाकून शेतकर्‍यांची चेष्ठाच त्यांनी केली आहे. निवडणुकीनंतर तिन्ही कारखान्यावर जप्ती येईल. या गर्तेतून वाचण्यासाठी आम्ही बंधूनी निवडणूक लढविली आहे.

आ. शशिकांत शिंदे म्हणाले, प्रतापगड सहकारी कारखान्यावरील देणी दिल्याचा कांगावा करीत करोडो रुपये कर्ज विद्यमान चेअरमनने प्रतापगड कारखान्यावर काढले. किसनवीर कर्जाच्या खाईत गेल्याचा ठपका प्रतापगड कारखान्यावर ठेवला जातो. किसनवीरची निवडणूक पाटील बंधुंसाठी नाही, तर पाच तालुक्यातील शेतकर्‍यांच्या अस्मितेसाठी आहे. यावेळी नितीन भरगुडे-पाटील, राजेंद्र शेलार, संदीप पोळ, कुमार बाबर, दिलीप पिसाळ, महादेव मस्कर यांनी मनोगत व्यक्त केले.

Back to top button