सातारा : यात्रा-जत्रांमुळे फूल बाजार वधारला | पुढारी

सातारा : यात्रा-जत्रांमुळे फूल बाजार वधारला

सातारा : पुढारी वृत्तसेवा

सध्या ग्रामीण भागात यात्रा-जत्रांचा हंगाम जोमात सुरू आहे. वार्षिक यात्रेत देवी-देवतांसाठी पूजा साहित्याबरोबर हार व फुलांना मागणी वाढली आहे. तापमानवाढ व वातावरणातील बदलामुळे फूल उत्पादन घटले आहे. मागणी व पुरवठ्याचे समीकरण विस्कळीत झाले असले तरी गेली दोन वर्षे आर्थिक तोट्यात आलेले फुल उत्पादक यात्रांच्या हंगामात मात्र सुखावले आहेत.

मागील दोन वर्षे कोरोनामुळे सण समारंभांबरोबरच ग्राम दैवतांच्या वार्षिक यात्रा साधेपणाने पार पडल्या. परंतु, यावर्षी कोरोना निर्बंध हटल्याने ग्रामीण भागात यात्रा-जत्रांचा हंगाम जोमात सुरू झाला आहे. मागील कसर भरुन काढत मोठ्या प्रमाणावर ग्रामदेवतांच्या यात्रा साजर्‍या होत आहेत. यात्रेनिमित्त देव-देवतांना हार-फुले अर्पण केली जातात. त्यामुळे फुलांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. उत्पादन खर्च व कष्टाला चांगले मोल मिळत असल्यामुळे फूल उत्पादक सुखावला आहे. हंगामी आणि नगदी पीक म्हणून फुलशेतीकडे पाहिले जाते. त्यामुळे उन्हाळ्यात लग्नसराई व यात्रा हंगामासाठी फुलशेतीला प्राधान्य दिले जाते.

मात्र, मागील दोन वर्षे सण-समारंभ तसेच लग्न कार्येही साधेपणाने व घरगुती पध्दतीनेच पार पडत होती. त्याचा सर्वात जास्त फटका फूल उत्पादकांना बसत होता. आता मात्र या वर्षीच्या यात्रा-जत्रांच्या हंगामात सर्वच प्रकारच्या फुलांना चांगली मागणी व दरही मिळत आहे. त्यामुळे मागील कसर भरून निघत आहे.

यात्रांनाही महागाईचा फटका

मार्च अखेरीपासून तापमानाचा पारा वाढला आहे. दिवसेंदिवस उष्णतेची धग वाढत असल्याने त्याचा फटका फुल शेतीला बसत आहे. अतिउष्म्याने झाडांना कळ्या लागण्याचे प्रमाण घटले आहे. लागलेल्या फुलांनाही रोगराईचा प्रादुर्भाव होत आहे. परिणामी फुलांचे उत्पादन घटले आहे. मागणी व पुरवठ्याचे समीकरण विस्कळीत झाल्याने फुलांचे दर कडाडले आहेत. त्यामुळे भाविक भक्तांच्या खिशाला हार फुलांसाठी आर्थिक चाट बसत आहे.

Back to top button