चाफळ : पवारवाडीतील ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती | पुढारी

चाफळ : पवारवाडीतील ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती

चाफळ : राजकुमार साळुंखे

चाफळपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या नाणेगांव खुर्द ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या पवारवाडी (ता. पाटण) येथील ग्रामस्थांना व न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमधील शिक्षक व मुलांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते. त्यामुळेच गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी लक्ष घालून भरीव निधी द्यावा, अशी मागणी पालक, विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी केली आहे.

चाफळ विभागातील नाणेगांव खुर्द ग्रामपंचायत अंतर्गत येणार्‍या पवारवाडी येथे शंभर ते सव्वाशे लोकवस्ती असून गेल्या अनेक वषार्ंपासून येथील ग्रामस्थांना उन्हाळ्यात व पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भेडसावत आहे. ग्रामपंचायतीमार्फत गावातील नदीच्या पात्रात असलेल्या विहिरीतील पिण्यासाठी योग्य नसलेले पाणी इतर खर्चासाठी थोडेफार दिले जाते. मात्र, पिण्याच्या पाण्यासाठी लहान मुलांपासून वयस्कर मंडळींना पहाटेपासून इतर ठिकाणी भटकंती करुन पाणी आणावे लागते. गावापासून जवळ असलेल्या खराडवाडी येथील गावातून ग्रामस्थांना नळ योजनेचे पाणी आणावे लागत आहे. तेही त्या गावातील ग्रामस्थांचे पाणी भरून झाल्यानंतर मग येथील ग्रामस्थांना पाणी शिल्लक राहिले, तर ते मिळते. अन्यथा रिकाम्या हाताने घरी भांडी घेऊन जावे लागते. तसेच न्यू इंग्लिश मीडियम स्कूल नाणेगांवच्या मुलांना व शिक्षकांना शाळेत पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने घरातूनच पाणी आणावे लागते. त्यामुळे राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी याकामी तातडीने लक्ष घालून भरीव निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

पवारवाडीतील ग्रामस्थांना पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी गावात बोअरवेल मंजूर झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांना भटकंतीच करावी लागत आहे.
-अधिक पवार, सामाजिक कार्यकर्ते, पवारवाडी.

Back to top button