महाबळेश्वर : पर्यटक दाम्पत्यास सिनेस्टाईल मारहाण | पुढारी

महाबळेश्वर : पर्यटक दाम्पत्यास सिनेस्टाईल मारहाण

महाबळेश्वर : प्रेषीत गांधी

महाबळेश्वरपासून एक किमी अंतरावरील मेढा-सातारा या रस्त्यावर निर्जन ठिकाणी पर्यटक दाम्पत्याला दुचाकीवरून आलेल्या तिघा अज्ञात हल्लेखोरांनी रॉडने बेदम मारहाण केली. यात हे दाम्पत्य जखमी झाले. ही घटना रविवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडली. मात्र, संबंधित दाम्पत्याने आमची कुणाबद्दल कोणतीही तक्रार नसल्याचा जबाब पोलिसांना दिल्याने या घटनेमागचे गूढ कायम राहिले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, महाबळेश्वर येथे लोणी काळभोर, पुणे येथून एक पर्यटक दाम्पत्य 3 दिवसांपूर्वी आले होते. ते शहरानजीक एका रिसॉर्टमध्ये वास्तव्यास होते. रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास हे पर्यटक दाम्पत्य मेढा-सातारा परिसरातील निर्जन रस्त्यावरून आपल्या वाहनाने निघाले असता मागून दुचाकीवरून तिघे अज्ञात हल्लेखोर आले अन् त्यांनी या पर्यटक दाम्पत्याच्या वाहनाचा प्रथम रस्ता अडवला व रॉडने वाहनाची काच फोडली. त्यानंतर वाहनातील पुरुषास खाली उतरवून रॉडने त्याच्यावर हल्ला चढवला. मारहाणीनंतर त्याला नजीकच्या जंगलात ढकलून दिले. महिलेच्या पायावरही रॉडने व लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यानंतर अज्ञात हल्लेखोरांनी पलायन केले. या जीवघेण्या हल्ल्यात जखमी झालेले हे पर्यटक दाम्पत्य उपचारासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात गेले. प्राथमिक उपचारानंतर तेथून ते निघून गेले.

याबाबतची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून स्थानिक पोलिसांना कळवण्यात आली. पोलिसांनी ही माहिती घेतल्यानंतर ते पर्यटक वास्तव्यास असलेल्या रिसॉर्टमध्ये याप्रकरणाबाबतची माहिती घेण्यास गेले. मात्र, या पर्यटक दाम्पत्याने आमची कुणाबद्दल-कोणतीही तक्रार नसल्याचे पोलिसांना सांंगितले.

दरम्यान या हल्ल्याबाबत पोलीस हे पूर्णपणे तिर्‍हाईताच्या भूमिकेत असून यासंदर्भात माहिती देण्यास देखील ते असमर्थता दाखवत आहेत. प्रथमदर्शनी तरी या हल्ल्याचे कारण महाभयंकर असल्याचे दिसून येत असून हा हल्ला पूर्व वैमनस्यातून झाला असावा की राजकीय वैमनस्यातून? की आणखी काही याचे कारण असू शकते? यात काही काळंबेरं असू शकतं का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत कोणतीही माहिती मिळाली नसून जखमी झालेले हे दाम्पत्य सध्या महाबळेश्वरमध्येच असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
पाळत ठेवून हल्ला केल्याचा संशय

पर्यटक दाम्पत्य हे तीन दिवसांपासून महाबळेश्वरमध्ये वास्तव्यास आहे. हे दाम्पत्य शनिवारी सकाळी आंबेनळी घाटामधून कोकणाकडे गेले होते. तेथून पुन्हा महाबळेश्वरकडे परतत असताना दुचाकीवरील हल्लेखोरत्यांचा पाठलाग करत होते, अशी माहिती मिळत आहे. हे दाम्पत्य 28 ते 32 वर्षे वयोगटातील आहे.

Back to top button