कराड : ‘बळीराजा’कडून महाराष्ट्र दिनी आंदोलन | पुढारी

कराड : ‘बळीराजा’कडून महाराष्ट्र दिनी आंदोलन

कराड; पुढारी वृत्तसेवा : मागील तीन वर्षापासून मुदत संपल्यानंतरही यशवंतराव मोहिते पतसंस्थेकडून ठेवीदारांच्या ठेवी परत केल्या जात नाही. सहकारमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे न्याय मागूनही ठोस कार्यवाही होत नाही, असा दावा करत बळीराजा शेतकरी संघटनेने महाराष्ट्र दिनी धरणे आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. पतसंस्थेचे संस्थापक डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या निवासस्थासमोर हे आंदोलन केले जाणार आहे.

बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील, सातारा जिल्हाध्यक्ष विश्वास जाधव, ठेवीदार भगवान पवार यांच्यासह सागर कांबळे, किशोर पाटील तसेच बळीराजा शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

यशवंतराव मोहिते पतसंस्थेत सातारा व सांगली जिल्ह्यातील हजारो शेतकर्‍यांच्या ठेवी अडकल्या आहेत. मागील दोन ते तीन वर्षापासून ठेवींच्या मुदती संपल्या आहेत. मात्र त्यानंतरही संचालक मंडळाकडून ठेवी परत केल्या जात नाहीत. याविरोधात जिल्हा निबंधक यांच्यासह सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, जिल्हा पोलिस प्रमुख यांनाही ठेवीदार शेतकर्‍यांकडून यापूर्वीच निवेदने देण्यात आली आहेत.

मात्र आजवर शेतकर्‍यांना हक्काचे पैसे मिळालेले नाहीत. बळीराजा शेतकरी संघटनेकडे अनेक शेतकर्‍यांनी कैफियत मांडत न्याय मिळवून देण्यासाठी पुढे येण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानुसार सर्वसामान्य ठेवीदार शेतकर्‍यांच्या हितासाठी यशवंतराव मोहिते पतसंस्थेविरोधात आम्ही आक्रमक भूमिका घेतली आहे. संचालक मंडळावर गुन्हा दाखल करून मुदत संपलेल्या शेतकर्‍यांच्या ठेवी व्याजासह परत कराव्यात, अशी मागणी पंजाबराव पाटील यांनी केली आहे. तसेच ही मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्र दिनी सुरू केलेले धरणे आंदोलन सुरू ठेवले जाणार असल्याचा इशारा पंजाबराव पाटील यांनी दिला आहे.

पाया पडलो, पण तरीही पैसे दिले नाहीत…

गोंदी येथील भगवान पवार या शेतकर्‍याने आपली पत्नी दवाखान्यात अ‍ॅडमिट असताना आपण डॉ. इंद्रजित मोहिते यांच्याकडे गेलो होतो. ठेवीच्या केवळ 10 टक्के रक्कम रूग्णालयात उपचारासाठी द्या असे म्हणत रूग्णालयाची कागदपत्रेही त्यांना दाखवली होती. अक्षरशः हातापाया पडलो आणि त्यानंतरही आमच्या हक्काचे पैसे मिळाले नाहीत, असा दावा केला आहे. उपचारावेळी माझ्या पत्नीचा मृत्यू झाला असे सांगत भगवान पवार यांनी आम्ही काय करायचे ? असा प्रश्न उपस्थित केला.

सहकार राज्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आंदोलन

राज्याचे सहकार राज्यमंत्री यांच्या भारती विद्यापीठमध्ये डॉ. इंद्रजित मोहिते पदाधिकारी आहेत. कारवाईची मागणी केल्यानंतर प्रशासनाकडून हतबलता व्यक्त होते. त्यामुळेच कारवाई टाळण्यासाठी कोणाचा तरी दबाव असावा, असे आम्हाला वाटते. त्यामुळेच ना. विश्वजीत कदम यांनी शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन करत वेळप्रसंगी त्यांच्या निवासस्थानीही आंदोलन करू, अशी भूमिका असल्याचे पंजाबराव पाटील यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांनी यावेळी सांगितले.

Back to top button