सातारा; पुढारी वृत्तसेवा : अॅड.गुणरत्न सदावर्ते यांच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात जुना गुन्हा दाखल असल्याने त्याप्रकरणी पोलिसांनी त्यांना मुंबईतून ताब्यात घेण्यासाठी तळ ठोकून आहेत. सातारा पोलिसांनी सकाळपासूनच फिल्डींग लावली आहे. मात्र मुंबईतील न्यायालय काय निर्णय देणार त्यावर पुढील बाबी अवलंबून आहेत. दरम्यान, खा. शरद पवार यांच्या निवासस्थानावरील हल्ल्याप्रकरणी सध्या सदावर्ते यांचा ताबा मुंबई पोलिसांकडे आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानावरील हल्ला प्रकरणी संशयित आरोपी म्हणून अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली आहे. गेली दोन दिवस ते पोलिस कोठडीत होते. आज त्यांची पोलिस कोठडी संपणार असून मुंबईतील न्यायालयात त्यांना हजर केले जाणार आहे. ही माहिती समोर आल्यानंतर सातारा पोलिस अलर्ट झाले आहेत.
कारण अॅड.गुणरत्न सदावर्ते यांच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल आहे. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने एका वृत्तवाहिनीवर त्यांनी बेताल वक्तव्य केले होते. तेढ निर्माण होईल असे वक्तव्य झाल्याने याप्रकरणी एका तक्रारदाराने शहर पोलिस ठाण्यात जावून तक्रार दिली.
साधारण दीड वर्षापूर्वी दाखल असलेल्या या गुन्ह्यात त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. यामुळे सातारा पोलिस ही संधी साधत अॅड. सदावर्ते यांचा ताबा घेण्यासाठी मुंबईला रवाना झाले आहेत.
हे ही वाचलं का ?