सातारा; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र केसरी किताबाचा विजेता कोल्हापुरचा मल्ल पृथ्वीराज पाटील याने मुंबईच्या प्रकाश बनकरला अस्मान दाखवत मानाची गदा मिळवली. मात्र या झालेल्या स्पर्धेनंतर बक्षीसच न मिळाल्याची खंत पृथ्वीराज पाटील यानं बोलून दाखवली आहे.
या झालेल्या कुस्ती नंतर एक इतिहास लिहिला गेला. अवघ्या २२ वर्षाच्या या मल्लाने कोल्हापूरचे नाव कुस्ती क्षेत्रात सुवर्ण अक्षरात कोरले. मात्र, त्याची साताऱ्यात झालेली उपेक्षा ही गंभीर असल्याचे बोलले जात आहे. यावर त्याचे चुलते संग्राम पाटील आणि जागतिक कुस्ती स्पर्धेतील विजेते सोनबा गोंगाने यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे.
कुस्ती पंढरीचा तब्बल 22 वर्षांचा दुष्काळ संपवत पै. पृथ्वीराज पाटील याने 'महाराष्ट्र केसरी'ची गदा कोल्हापुरात आणली. राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृतिशताब्दी वर्षाच्या निमित्ताने पृथ्वीराजने आपल्या सर्वोत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून 'लोकराजा'ला मानाचा मुजरा केला. महाराष्ट्र राज्यातील सर्वोत्कृष्ट स्पर्धा असणार्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेची सुरुवात सन 1961 साली झाली.
पृथ्वीराज पाटील झाल्यानंतर त्याला बक्षीसापोटी काहीच न रक्कम मिळाल्याने सोशल मीडियात चांगलाच संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पृथ्वीराज पाटीलला भाजपकडून ५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. त्यांनी पृथ्वीराज पाटीलचे अभिनंदन केले.