कराड : वीज कंपनीस 16 लाखांचा फटका | पुढारी

कराड : वीज कंपनीस 16 लाखांचा फटका

कराड; पुढारी वृत्तसेवा : शुक्रवारी दुपारी झालेल्या वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाने कराड व पाटण तालुक्यात वीज वितरण कंपनीचे सुमारे 83 विद्युत पोल पडल्याने सुमारे 15 ते 16 लाखाचे नुकसान केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. एकट्या कराड शहरात 17 हून अधिक विद्युत पोल पडले असून शहरातील काही भागात 27 तासाहून अधिक काळ वीज पुरवठा बंद होता. ग्रामीण भागात गहू तसेच उसाचे मोठे नुकसान झाले आहे. तर आंबा उत्पादक शेतकर्‍यांना वादळी वार्‍याने तडाखा दिला आहे.

प्रीतिसंगम बागेला मोठा फटका

शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास वादळी वार्‍याने जोरदार पावसासह हजेरी लावली होती. वार्‍यामुळे स्व. यशवंतराव चव्हाण समाधीस्थळ परिसरातील प्रीतिसंगम बागेत दोन वृक्ष मुळासह उन्मळून पडले आहेत. याशिवाय बागेतील छोटे छोटे वृक्ष तसेच पाच ते सहा झाडांच्या फांद्या नागरिकांना बसण्यासाठी केलेले बेंच, लहान मुलांची खेळणी तसेच बागेच्या सुशोभीकरणासाठी बसवलेले दिवे व करण्यात आलेल्या रेलिंगवर पडले आहेत. त्यामुळेच प्रीतिसंगम बागेला वादळी वार्‍याचा मोठा तडाखा बसल्याचे शनिवारी सकाळी पहावयास मिळाले.

कराड – विटा मार्गालगत नुकसान

बागेची अशी अवस्था असताना कराड – विटा मार्गावर बसस्थानक परिसरापासून कृष्णा नाक्यापर्यंत ठिकठिकाणी मार्गालगचे वृक्ष, फांद्या वीज कंपनीच्या पोलवर पडल्याने वीज पोल वाकणे, विद्युत वाहक तारा तुटणे असे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडले आहेत. कृष्णा नाका परिसरात चार ठिकाणी अशी परिस्थिती झाली आहे. या परिसरात सकाळपासून नगरपालिका कर्मचार्‍यांकडून पडलेली झाडे, फांद्या कट करून साफसफाई सुरू करण्याची कार्यवाही सुरू होती.

सूर्यवंशी मळ्यात पडले 8 पोल

कराड शहरात शुक्रवारी वादळी वार्‍यामुळे साडेतीन वाजण्याच्या सुमारास संपूर्ण शहरातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. वाखाण परिसरातील काही भाग, सूर्यवंशी मळा तसेच परिसरातील विद्युत पुरवठा शुक्रवार दुपारपासून शनिवार सायंकाळपर्यंत पूर्ववत होऊ शकला नव्हता. सूर्यवंशी मळा परिसरात 8 विद्युत पोल पडल्याचे स्थानिकांनी सांगितले. त्यामुळेच स्थानिकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागला. त्याचबरोबर शनिवारी सकाळी दत्त चौकासह काही परिसरातील विद्युत पुरवठा खंडित करत वीज वितरण कंपनीच्या कर्मचार्‍यांकडून दुरूस्तीचे काम सुरू करण्यात आले होते. रात्री उशिरापर्यत हे काम सुरूच होते. सायंकाळी सव्वासातला वाखाण परिसरात वीज पुरवठा पूर्ववत झाला.

अनेक ठिकाणी ऊसतोडी ठप्प …

कराड परिसरासह तालुक्यातील ग्रामीण भागात जोरदार पाऊस झाल्याने ऊस तोडी ठप्प झाल्याचे पहावयास मिळत आहे. शेतात पाणी साचल्याने आणि जोरदार वार्‍यामुळे ऊस अक्षरशः झोपल्यासारखी परिस्थिती काही ठिकाणी पहावयास मिळत आहे. याशिवाय गहू आणि आंबा पिकांचे मोेठे नुकसान झाल्याने बळीराजा हवालदिल झाल्याचे पहावयास मिळत आहे.

300 हून अधिक कर्मचार्‍यांनी रात्र काढली जागून

कराड व पाटण तालुक्यातील अनेक गावातील वीज पुरवठा खंडीत झाला होता. रात्री उशिरा अपवाद वगळता बहुतांश भागातील वीज पुरवठा पूर्ववत करण्यात वीज कंपनीचे अधिकारी, कर्मचारी यांना यश आले. त्यासाठी शुक्रवार दुपारपासून शनिवार सायंकाळपर्यंत कराड व पाटण तालुक्यात 300 हून अधिक कर्मचारी व अधिकारी कष्ट घेत होते, अशी माहिती कार्यकारी अभियंता रवींद्र बुंदेले यांनी दिली आहे.

Back to top button