सातारा : 34 वर्षांपूर्वीच्या कुस्तीची आजही चर्चा | पुढारी

सातारा : 34 वर्षांपूर्वीच्या कुस्तीची आजही चर्चा

सातारा; सुनील क्षीरसागर : 34 वर्षांपूर्वी कुस्ती इतिहासातील अजरामर कुस्ती झाली होती. कोल्हापूर जिल्ह्यातील युवराज पाटील विरुद्ध दिल्लीचा प्रसिद्ध मल्ल सतपाल. यात युवराज पाटील याने सर्वांचे आडाखे चुकवत सतपालवर मात केली होती.

1970-80 च्या दशकात अवघ्या देशात सतपाल नावाचं वादळ कुस्तीत घोंगावत होतं. त्याचवेळी सर्वात लहान वयात महाराष्ट्र केसरीची गदा आपल्या नावे करून पै. युवराज पाटीलच्या रूपाने एक तरुण मल्ल नावारूपास येत होता.

त्यावेळी सतपाल नावाच्या वादळात अनेक पैलवान मैदानात चितपट झाले होते. त्यावेळी महाराष्ट्रातील तमाम कुस्ती शौकिनांना एकच प्रश्न सतावत होता, तो म्हणजे कोण रोखेल उत्तर भारतीयांचं वादळ? त्यावेळी महाराष्ट्रात पै. बिराजदार सोडून एकही पैलवान सतपालच्या तोडीचा नव्हता. त्याचवेळी कोल्हापूर शाहू नगरीतील एक विशीतला पैलवान उत्तर भारतीयांचं आव्हान स्वीकारण्यासाठी पुढं आला, तो म्हणजे पै. युवराज पाटील.

खासबागमध्ये 1 एप्रिल 1978 साली पै. सतपाल विरूद्ध पै. युवराज पाटील अशी कुस्ती जोडण्यात आली. सर्व कुस्ती शौकिनांना वाटत होते की, या कुस्तीत पै. सपाल सहज विजयी होईल. परंतु, सर्वांचे अंदाज फोल ठरवत पै. युवराज पाटील यांनी पै. सतपालला एकलांगी डावावर चितपट करत संपूर्ण देशात एका धक्कादायक निकालाची नोंद केली. युवराज पाटील यांनी सत्पालला दोन वेळा पराभूत करुनही उत्तरेकडील वस्ताद व पाठीराख्यांनी त्याचा पराभव मान्य केला नव्हता, त्यामुळे पुन्हा 11 फेब्रुवारी 1984 ला खासबाग मैदानात ही कुस्ती झाली. खासबाग मैदान खचाखच भरलं होतं. थोड्याच वेळात तो क्षण जवळ आला, कुस्तीची सलामी झडली. दोघेही सावध पावित्र्यात लढत एकमेकांच्या ताकतीचा अंदाज घेत होते. जशी वेळ पुढे सरकत होती तसे दोघेही मल्ल एकमेकांवर तुटून पडू लागले होते. डाव प्रती डाव करत कुस्ती चालली होती.अचानक युवराज पाटील यांनी बिजलीच्या चपळाईने सत्पालचा दुहेरी पट काढत, पाठीवर ताबा घेत थोड्याच वेळात एकलांगी डावावर स्वार होत युवराज पाटीलने सतपालला अस्मान दाखवले….! याच कुस्तीची आजही मोठ्या प्रमाणावर चर्चा होते…

Back to top button