सातारा : कर्ज काढून जिंकली हेलसिंकी ऑलिम्पिक | पुढारी

सातारा : कर्ज काढून जिंकली हेलसिंकी ऑलिम्पिक

सातारा पुढारी वृत्तसेवा : खाशाबा त्यावेळी विद्यार्थी दशेत होते. पण, अभ्यासू होते. स्पर्धेचा अंदाज त्यांना लंडनमध्येच आलेला होता. आता स्पर्धा जिंकण्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं. गोविंद पुरंदरे यांनी पैलवानावर मेहनतही घेतली. किरकोळ शरीरयष्टीचे खाशाबा बँटमवेट(52 किलो) या तळाच्या वजनी गटात फ्रीस्टाईल कुस्ती खेळत. त्यांचा स्टॅमिना असा की ते अव्याहत खेळू शकत होते. अंगभूत हुशारीने त्यांनी स्वत:ला मॅटसाठी तयार केलं. पैशाची जमवाजमव या विषयाने मात्र त्यांना थकवलं. हेलसिंकीसाठी पैसे हवे होते. यावेळी त्यांच्या कॉलेजचे प्राचार्य खर्डीकर यांनी राहतं घर गहाण टाकून सात हजार रुपये उभे केले. एका बँकेकडून सहा हजारांचं कर्ज घेतलं आणि त्यातून ही हेलसिंकी वारी शक्य झाली. तिथे पदक जिंकल्यावर मात्र गावकर्‍यांनी कर्‍हाडपासून जन्मगाव गोळेश्वर पर्यंत 151 बैलगाड्यांची मिरवणूक काढली होती.

स्वतंत्र भारताला पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे सातारा जिल्ह्यातील खाशाबा जाधव

देश स्वतंत्र झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची ओळख तयार करण्याचा नवीन लढा देशात नुकताच सुरू झाला होता. गरिबी हे आव्हान होतं आणि हाताशी अगदी तुटपुंजी साधनं होती. अशावेळी क्रीडा क्षेत्रात ज्यांनी भारताची प्रतिमा उंचावली अशी दोन व्यक्तिमत्त्व म्हणजे हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद आणि कुस्तीतले सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील गोळेश्वरचे पैलवान खाशाबा जाधव. पैकी ध्यानचंद यांचा जन्मदिवस आपण क्रीडादिवस म्हणून साजरा करतो. पण, मराठमोळ्या खाशाबांचं आयुष्य काही कमी प्रेरणादायी नाही. ऑलिम्पिकमध्ये स्वतंत्र भारताला पहिलं वैयक्तिक मेडल मिळवून देण्याचा मान त्यांच्याकडे जातो.

ऑलिम्पिक मेडलचा रोमांचक प्रवास

खाशाबा जाधव हे भारतीय कुस्ती क्षेत्रात एक चालता बोलता महापराक्रम आहे. पण, त्यांनी मेडल कसं जिंकलं ही कहाणी अगदीच रोमांचक आहे. जाधव यांच्या आयुष्यावर ज्येष्ठ क्रीडा पत्रकार संजय दुधाणे यांनी ’ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव’ या नावाचं पुस्तक लिहिलं आहे. त्यात मेडल जिंकलेल्या प्रसंगाचं वर्णन केलेलं आहे.

खाशाबा जिंकण्याच्या मनसुब्याने हेलसिंकीत आले होते. त्यांचं लक्ष कुस्ती सोडून इतर कुठेही नव्हतं. खाशाबा जाधव यांच्याबरोबर तेव्हा भारतीय संघातील कुणीही नव्हतं. वेळ तर अजिबात नव्हता. तयार होऊन कुस्तीसाठी उतरायचं हा एकमेव पर्याय होता. शेवटी ते सामन्यासाठी मॅटवर उतरले. नशिबाने पहिला प्रतिस्पर्धी न आल्यामुळे बाय मिळाला. त्यानंतर कॅनडा, मेक्सिको आणि जर्मनीच्या मल्लांवर त्यांनी लीलया मात केली अन् त्यांनी स्वतंत्र भारताला पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून दिले.

क्वार्टर फायनलची लढत रशियाच्या मेमेदबेयोव्हविरुद्ध होती. हा प्रतिस्पर्धी तगडा आहे याची कल्पना खाशाबांना होती. मॅचची तयारीही त्यांनी केलेली होती. पण, प्रत्यक्ष मॅटवर ही लढत तासाभरापेक्षा जास्त चालली आणि खाशाबांना 0-3 असा पराभव पत्करावा लागला. काही जाणकारांच्या मते, मॅचमध्ये पंचांचे काही निर्णयही खाशाबांच्या विरुद्ध गेले, असा उल्लेख संजय दुधाणे यांच्या पुस्तकात आहे.

त्यानंतर जपानच्या शोहोची इशी या मल्लाबरोबरही त्यांना अपयश आले. रशियाला सुवर्ण मिळालं आणि भारताला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. ’जर व्यवस्थापक खाशाबांबरोबर असते, त्यांनी बाजू मांडली असती, अगदी पंचांच्या निर्णयावरही जरी दाद मागितली असती तर निकाल कदाचित वेगळा असता. भारताच्या खिशात रौप्य नाहीतर सुवर्णही पडलं असतं. प्रत्यक्षात खाशाबा यांच्या सर्व लढती संपल्यावर अगदी पदक वितरणाचा कार्यक्रम पार पडल्यावर भारतीय संघ परतला. पदक स्वीकारतानाही खाशाबा एकटेच होते. पण, त्यांना प्रसंगाचं महत्त्व होतं. त्यांनी धावत तिरंगा आणला तो आपल्याभोवती गुंडाळला आणि अभिमानाने ते पदक स्वीकारायला गेले.

पदक जिंकल्यानंतरही आबाळच…

खाशाबा गरीब शेतकरी कुटुंबातले होते. घरी कुस्तीचं वातावरण होतं. पण, ऑलिम्पिक पदक जिंकल्यानंतर खाशाबांची आबाळच झाली. पोलिस खात्यात त्यांना नोकरी लागली ती पदक विजेत्या कामगिरीनंतर तब्बल चार वर्षांनी. पोलिस दलातही उपनिरीक्षक म्हणून लागले. आणि पुढची 22 वर्षे एकाही बढतीशिवाय त्यांनी काढली. प्रशिक्षक म्हणून त्यांचा अनुभव उपयोगी पडेल असं सरकारला कधी वाटलं नाही, खाशाबांनी इच्छा दाखवूनही. अखेर 1984 मध्ये एका मोटार अपघातात त्यांचं निधन झालं.

Back to top button