Koyna Dam: धरणात १५.३५ टीएमसी पाणीसाठा शिल्लक

कोयनेच्या पाणीसाठ्याची काळजी घेण्याची गरज; मागील काही वर्षात याहीपेक्षा कमी पाणीसाठा
Koyna Dam
Koyna DamPudhari
Published on
Updated on
गणेशचंद्र पिसाळ

पाटण : कोयना धरणातील एकूण पाणीसाठा व मागील चौदा वर्षातील तांत्रिक आकडेवारी लक्षात घेता याहीपेक्षा भीषण परिस्थिती या अगोदरच्या काही वर्षात धरणाने अनुभवली आहे. सध्याचा उपलब्ध १५.३५ व उपयुक्त १०.२३ टीएमसी पाणीसाठा लक्षात घेता मागील काही वर्षात याहीपेक्षा कमी साठा धरणामध्ये शिल्लक असल्याची आकडेवारी आहे. सध्याचा पाणीसाठा व लवकरच येणारा मान्सून याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले आणि आजवर निसर्ग कधीही कठोर झाला नाही हा इतिहासही तपासून पाहिला तर सध्याच्या पाणीसाठ्याबाबत काळजी करण्यापेक्षा काळजी घेतली तर निश्चितच आगामी जलप्रवास सुखकर व सकारात्मक होईल, असा ठाम विश्वास जलतज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.

१०५.२५ टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या या धरणात सध्या उपलब्ध १५.३५ टीएमसी (१४.५८ टक्के) तर उपयुक्त १०.२३ टीएमसी (१०.२१ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. मागील चौदा वर्षातील आढावा घेतला असता २७ जून २०२१ रोजी केवळ १०.७३ टीएमसी तर २४ जून २०२३ रोजी १०.७१ टीएमसी इतकाच पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे तुलनात्मक विचार केला तर या वर्षापेक्षा मागील काही वर्षात धरणात याहीपेक्षा कमी पाणीसाठा असल्याची तांत्रिक आकडेवारी आहे. त्यानंतरच्या काळात धरणात अपेक्षित व मुबलक पाऊस पडला व यातूनच धरणात अपेक्षित पाण्याची आवक झाली. यातून जलवर्षातील सिंचन व वीजनिर्मितीची गरज भागली.

वास्तविक धरणातील पाणीसाठा जवळपास शंभर टक्के वापरात यावा अशीच मानसिकता ठेवून धरणांची निर्मिती केली जाते, मात्र कित्येकदा भविष्यातील नियोजन, उपाययोजना व अंमलबजावणी या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून शंभर टक्के पाणीसाठा वापरला जात नाही. अलीकडच्या काही वर्षांत सातत्याने होणारे नैसर्गिक बदल लक्षात घेता प्रशासनही अत्यंत सावध भूमिका घेताना पहायला मिळते. त्यामुळे जलवर्षात पूर्णपणे पाणीसाठा वापरला तर आरक्षणासह नैसर्गिक आव्हाने व सामाजिक परिस्थिती बिघडू शकते, याशिवाय कित्येकदा पाणी सोडले तरी अडचणी व नाही सोडले तरी अडचणी अशा दुहेरी कात्रीत प्रशासनाला अडकावे लागते. तरीदेखील अशा आव्हानात्मक परिस्थितीला तोंड देत धरण व्यवस्थापनाकडून आजवर अनेकदा यशस्विपणे वीजनिर्मिती करून सिंचनाची गरज भागवत पूर, महापुरावर नेटके नियोजन केल्याचेही सर्वज्ञात आहे.

सध्याचा धरणातील पाण्याचा विचार करता एका बाजूला भविष्यातील अल निनोचा धोका व कमी पावसाचा अंदाज असल्याने प्रशासनाकडून सार्वत्रिक खबरदारी घेण्यात आली आहे. पश्चिमेकडील वीज निर्मिती बंद ठेवत पूर्वेकडे केवळ कोयना धरण पायथा वीजगृहातून एका जनित्राद्वारे वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद केवळ १०५० क्युसेक्स इतकेच पाणी पूर्वेकडे कोयना नदीपात्रात सोडण्यात आले आहे. हे पाणी केवळ पिण्यासाठीच वापरणे बंधनकारक करण्यात आले असून शेती, खाजगी व औद्योगिक पाणीपुरवठा योजनांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

वास्तविक कोयना धरण पायथा वीजगृहातून दोन्ही जनित्राद्वारे वीजनिर्मिती करून पूर्वेकडे सिंचनासाठी प्रतिसेकंद २१०० क्युसेक्स पाणी सोडले तरी दरमहा ५ टीएमसी पाण्याचा वापर होतो. सध्या तर केवळ पिण्याच्या पाण्यासाठीच पाणी सोडण्यात आल्याने सोडलेल्या पाण्यावर पाटण, कराड, सांगली ते अगदी अलमट्टी धरणापर्यंत कोयना व कृष्णा नदीच्या पाण्यावर अवलंबून पिण्याच्या पाण्याची गरज भागवली जाते आहे. याशिवाय दुर्दैवाने पाऊस लांबणीवर पडला तरी तूर्तास पिण्याच्या पाण्याची कोणतीही चिंता करण्याचे काहीच कारण नाही.

हवामान खात्याच्या माहितीनुसार मान्सून केरळ राज्यात दाखल झाला असून लवकरच तो महाराष्ट्र व कोयना धरण परिसरातही अपेक्षेप्रमाणे पडेल असाही सकारात्मक दावा प्रशासनाकडून होत आहे. त्यामुळे कोयनेच्या सध्याच्या पाण्याची काळजी करण्यापेक्षा जर काळजी घेतली आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर निश्चितच या जलवर्षातील एकूण जलप्रवास अधिक सुखकर होईल असा ठाम विश्वासही जलतज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news