सातारा: उद्या गुढीपाडवा; बाजारपेठेत गोडवा | पुढारी

सातारा: उद्या गुढीपाडवा; बाजारपेठेत गोडवा

सातारा; पुढारी वृत्तसेवा : कोरोना प्रादुभाव कमी झाल्याने शासनाचे कोरोना निर्बंध हटले आहेत. त्यामुळे साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असलेला गुढीपाडव्याचा सण यावर्षी मोठ्या प्रमाणावर साजरा होणार आहे. कोरोना व आर्थिक नुकसानीचे मळभ दूर झाले आहे. व्यापार उद्योग सुरळीत सुरु झाल्याने बाजारपेठेतही तेजी आली असून नागरिकांमध्येही सणाचा उत्साह संचारला आहे. त्यामुळे पाडव्याच्या पार्श्वभूमीवर नवीन वास्तू, दागिने, गाडी, वस्तूंच्या बुकींगची लगबग सुरु असल्याने आर्थिक उलाढाल वाढणार आहे.

हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. गोडाधोडाच्या जेवणाबरोबरच नवीन वस्तूची घरात खरेदी केली जाते. त्यामुळे पाडव्याला बाजारपेठेत लाखोंची उलाढाल होते. घरगुती वापराच्या वस्तूंपासून गाडी, सोन्या-चांदीचे दागिने खास पाडव्याच्या मुहूर्तावर खरेदी केले जातात. या खरेदीतून लाखोंची उलाढाल होते. मागील दोन वर्षे सर्व सण समारंभ कोरोना निर्बंधाच्या जोखडात अडकले होते. त्यामुळे गुढीपाडवादेखील घरगुती आणि साध्या पध्दतीनेच साजरा करण्यात आला होता.

यावर्षी मात्र कोरोना प्रादुर्भाव कमी झाला आहे. शासनाचे कोरोना निर्बंध हटले आहेत. त्यामुळे साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असलेला गुढीपाडव्याचा सण यावर्षी मोठ्या प्रमाणावर साजरा होणार आहे. त्यामुळे बाजारपेठही पाडव्यासाठी सज्ज झाली आहे. गुढीपाडव्याला चांगली खरेदी करण्याचे बेत अनेकांनी आखले आहेत.

सध्या व्यापार-उद्योग सुरळीत सुरु झाल्याने बाजारपेठेतही तेजी आली असून नागरिकांमध्येही सणाचा उत्साह संचारला आहे. पाडव्याच्या मुहूर्तावर नवीन घर, गाडी, सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल, लॅपटॉपसह इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू आदिंची खरेदी केली जाणार आहे. व्यावसायिकांकडूनही अगाऊ बुकींगची सोय उपलब्ध करुन देण्यात आली असून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध ऑफर्सचा वर्षाव केला जात आहे. त्यास ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. ऐन सणात गडबड नको म्हणून अनेकांनी अगाऊ बुकींग देखील केले आहे. त्यामुळे गुढीपाडव्याला बाजारपेठेत आर्थिक उलाढाल चांगलीच वाढणार आहे.

पाडव्यालाही महागाईची झळ…

पाडव्याच्या पार्श्वभूमीवर विविध प्रकार व उंचीच्या रेडीमेड गुढ्या नागरिकांचे विशेष आकर्षण ठरत आहेत. तसेच घरगुती गुढीसाठी लागणार्‍या साखर गाठी, बांबू, हार-फुले यांची रेलचेल वाढली असून ते खरेदी करताना मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या दरवाढीचा फटका बसत आहे. जीवनावश्यक वस्तू व खाद्यतेल महागल्याने गोडधोडाच्या जेवणासह पाडव्याच्या सर्वच खरेदीला महागाईची झळ लागणार आहे.

Back to top button