सातारा: जावयाची मिरवणूक? चर्चा तर होणारच! | पुढारी

सातारा: जावयाची मिरवणूक? चर्चा तर होणारच!

सातारा पुढारी वृत्तसेवा : जवळपास 75 वर्षांहून अधिक काळ राज्यात प्रसिद्ध असलेली पुसेसावळीतील जावयाची मिरवणूकही कालबाह्य झाली असली तरी धुलीवंदन ते रंगपंचमी या कालावधीत या मिरवणुकीच्या जुन्या आठवणी व चर्चा मात्र आजही सुरु आहेत.

गेली कित्येक वर्षे पुसेसावळीतील जावयांच्या उरात धडकी भरवणारा हा धुलीवंदन ते रंगपंचमीचा काळ. या काळात पुसेसावळीतील जावई पुसेसावळीत आला आणि ग्रामस्थांना दिसला तर त्या जावयांचे काही खरे नसायचे. जावयाला पकडून त्याला गाढवावर बसवून वाजत गाजत गावातून मिरवणूक निघायची.

जुने हार, टायर गळ्यात पडायचे. टोमॅटो, अंड्यांचा वर्षाव व्हायचा. तद्नंतर सासरवाडीत स्नान घालून पेहराव मिळायचा. एकदा का मिरवणूक निघाली की जावई मात्र सुटकेचा नि:श्वास सोडायचा. या अनोख्या मान-सन्मानामुळे ही जावयाची मिरवणूक प्रसिद्ध झाली होती.

या कालवधीत या गावचे काही जावई इतर नातेवाईकांकडे तर काही जावई टूर वर जात होते. सध्या ही प्रथा बंद असली तरी या प्रथेची दहशत मात्र कायम आहे. आजही या कालावधीत काही जावई पुसेसावळीतून बाहेर जाणे पसंत करतात. मग अशा या प्रथेची चर्चा तर होणारच..!

Back to top button