

सातारा : जिल्ह्यात 100 दिवसीय क्षयरोग मोहिमेत जिल्ह्यातील अति जोखमीच्या 5 लाख 67 हजार 799 रूग्णांची आरोग्य विभागामार्फत तपासणी करण्यात आली. त्यापैकी संशयित 74 हजार 168 रुग्णांची एक्सरे, मायक्रोस्कोपीमार्फत तपासणी करण्यात आली. या मोहिमेमध्ये 1 हजार 311 क्षयरोग रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, संबंधीत रुग्णांच्या सान्निध्यातील व्यक्तींना टी. बी. प्रिव्हेंटिव्ह थेरपी देण्यात येत आहे.
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात 100 दिवसीय क्षयरोग शोध मोहीम राबवण्यात आली. मोहिमेचा उद्देश हा जास्तीत जास्त क्षयरुग्ण शोधून त्यांना उपचारावर आणणे, क्षय रुग्णांचा मृत्यूदर कमी करणे, नवीन क्षयरुग्णांचे प्रमाण कमी करणे, वंचित व अतिजोखमीच्या घटकापर्यंत पोहोचून आरोग्य सेवा पुरवणे, क्षयरोगाविषयी जनजागृती करणे, समाजामधील क्षयरोगविषयी जनजागृती करणे व सामाजिक कलंक कमी करण्यासाठी उपक्रम राबवणे, जिल्ह्यातील संमती दिलेल्या क्षयरुग्णांना पंतप्रधान क्षयमुक्त भारत अभियानांतर्गत निक्षयमित्रांकडून पोषण आहार कीटचे वाटप करणे असा आहे. सन 2025 पर्यंत जिल्हा क्षयमुक्त होईल यासाठी प्रयत्न करावेत. 100 दिवसीय क्षयरोग मोहीमेमध्ये सातारा जिल्ह्याचा समावेश आहे. 100 दिवसीय क्षयरोग शोध मोहिमेमध्ये जोखीमग्रस्त भाग निवडून त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. नि-क्षय शिबिर, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, उद्योग संस्था, निवासी शाळा, कारागृह, येथे क्षयरोग तपासणी शिबिर व स्थलांतरीत, ऊस तोडणी कामगार, उच्च जोखीमग्रस्त भाग व वंचित घटक यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 100 दिवसीय मोहिमेंतर्गत जनजागृती करण्यात आली आहे. अति दुर्गमभाग, वाडी-वस्ती या ठिकाणी सर्वेक्षण करण्यात आले आहे. टीबीमुक्त ग्राम पंचायत अभियान, राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाच्या धोरणानुसार सन 2025 पर्यंत टीबीमुक्त भारत करण्याचा उद्देश आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत टीबीमुक्त करण्यात येणार आहेत. या करता केंद्रशासनाने टीबीमुक्त पंचायत अभियान सुरु केले आहे. जिल्ह्यातील 1498 ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला असून त्यापैकी 103 ग्रामपंचायती टीबीमुक्त ग्रामपंचायत म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत.