

सातारा : ‘माझ्याकडे स्मशानी शक्ती आहे. मी पैशांचा पाऊस पाडतो. मी पैसे डबल करून देतो,’ असे सांगत चौघांना तब्बल 13 लाखांना गंडा घातल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी संतोष श्रवण लोखंडे (रा. सातारा) याच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात रत्नागिरी, मुंबई जिल्ह्यातील चौघांची फसवणूक झाली आहे.
जहीर अब्बास मनचेकर (वय 40, रा. बिलये, ता. राजापूर, जि. रत्नागिरी) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. फसवणुकीची घटना जुलै 2018 पासून वेळोवेळी घडली आहे. तक्रारदार जहीर मनचेकर वेल्डिंग, मजुरीचे काम करतात. मित्राच्या ओळखीतून संशयित संतोष लोखंडे याची मनचेकर यांच्यासोबत ओळख झाली. लोखंडे याने ‘माझ्याकडे स्मशानी शक्ती आहे. मी पैशांचा पाऊस पाडतो. मी पैसे डबल करुन देतो,’ असे सांगून विश्वास संपादन केला. त्यानुसार मनचेकर यांनी लोखंडे याच्या बँक खात्यावर 2 लाख 25 हजार, समक्ष भेटून मुंबई, सातारा, राजापूर येथे रोख 5 लाख 75 हजार रुपये दिले. तसेच मित्रांकडून उसने पैसे घेवून 5 लाख रुपये दिले.
दिलेल्या पैशांचे डबल पैसे मिळणार असल्याने ते लोखंडेकडे वारंवार पैसे मागत होते. त्यावेळी लोखंडे पैशांचे बंडल दाखवत होता. मात्र तुझे पैसे नंतर देतो, असे सांगून वेळ मारुन नेत होता. पैसे माघारी परत न देता उलट लोखंडे काम होत आले आहे, आणखी थोडे थांब असे म्हणत होता. तसेच आणखी 5 लाख रुपये दिले तर तुमचे काम होईल, असे सांगत होता. यासाठी लोखंडे याने मनचेकर यांना सातार्यात बोलावून तामजाईनगर येथील एका फ्लॅटमध्ये नेले. तेथे त्याने पैशांच्या नोटांची थप्पी दाखवली.
मात्र तरीही लोखंडे आणखी 5 लाख रुपये मागत होता. मनचेकर यांनी अधिक माहिती घेतली असता मनचेकर यांचे मित्र अभिषेक साळस्कर, उदय सावंत, नथू शिंदे यांच्याकडूनही संशयित लोखंडे याने पैसे घेतल्याचे समोर आले. लोखंडे याच्याकडे पैशांचा तगादा लावल्यानंतर तो टाळाटाळ करु लागल्यानंतर मनचेकर यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.