Koyna Dam | कोयना धरणातून या जलवर्षात 115 टीएमसी पाणीवापर
गणेशचंद्र पिसाळ
पाटण : एक जूनपासून सुरू झालेल्या कोयना धरणाचे तांत्रिक जलवर्ष संपले आहे. 105.25 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या या धरणाचा बारा महिन्यांचा तांत्रिक जलवर्षाचा कालावधी संपल्यानंतर धरणात 23.13 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. यावर्षी धरणात तब्बल 186.99 टीएमसी पाण्याची आवक झाली.
या जलवर्षात वापरासाठी 114.64 व विनावापर 59.30 अशा एकूण 173.94 टीएमसी पाण्यानंतरही सध्या नव्या वर्षारंभाला 23.12 टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक आहे. या जलवर्षात जादा पाऊस, मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होऊनसुद्धा पावसाळ्यात पूर, महापुराचे योग्य नियोजन, उपाययोजना करण्यासह वर्षभरात सिंचन व वीजनिर्मितीसाठी निश्चितच सकारात्मक व काटेकोर नियोजन केल्याने प्रशासनाचे सार्वत्रिक कौतुक होत आहे.
गतवर्षी धरणातून ऐतिहासिक असा सिंचनासाठी तब्बल 38.14 टीएमसी पाणीवापर झाला होता. तर पश्चिम वीजनिर्मितीसाठी आरक्षित 67.50 टीएमसी पाणी वापराला कात्री लागल्याने केवळ 57.22 टीएमसी पाण्यावरच पश्चिम वीजनिर्मिती झाली होती. यावर्षी सुरुवातीपासूनच धरणाची तांत्रिक स्थिती समाधानकारक होती.
एक जूनपासून सुरू झालेल्या नव्या तांत्रिक जलवर्षात 18 टीएमसी शिल्लक पाणीसाठ्यावर सुरुवात झाली होती. या जलवर्षात तब्बल 186.99 टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. त्यापैकी पश्चिम वीजनिर्मितीसाठी 68.25, सिंचनासाठी 28.44 व पूरकाळातील 9.10 टीएमसी पाणी हे वीजनिर्मिती करून व विना वीजनिर्मिती करता आपत्कालीन दरवाजातून 8.85 तसेच सांडवा तथा धरण दरवाजातून 59.30 असे विनावापर सोडलेले 68.15 अशा एकूण 173.94 टीएमसी पाण्यानंतरही धरणात सध्या 23.13 टीएमसी पाणी शिल्लक आहे.
या जलवर्षात कोयना 5788 मिलिमीटर, नवजा 6862 मिलिमीटर, महाबळेश्वर 6647 मिलिमीटर एकूण पावसाची नोंद झाली आहे. नव्या वर्षारंभाला धरणात सरासरीच्या तुलनेत ज्यादा म्हणजेच 23.12 टीएमसी पाणीसाठा शिल्लक असल्याने आगामी सिंचन व निर्मितीसाठी निश्चितच ही समाधानाकारक बाब आहे. त्याचवेळी नवीन जलवर्षात सरासरीपेक्षा जादा पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवल्याने आगामी पूर, महापूर व गरजा यासाठी आवश्यक नियोजन व उपाययोजनाही प्रशासनासाठी तितक्याच महत्त्वाच्या आहेत.

