

सातारा : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणारी दहावी बोर्ड परीक्षा शुक्रवार दि.20 फेब्रुवारी रोजी सुरु होत आहे. या परीक्षेतील गुणवत्तेवर विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाची दिशा ठरणार असल्याने ही परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांची कसोटी ठरणार आहे. शिक्षण विभागाच्यावतीने जिल्ह्यात 116 केंद्रांवर सज्जता झाली असून 38 हजार 66 विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत. पहिला पेपर मराठीचा असला तरी ही परीक्षा गुणवत्ता सिद्धतेचा एक टप्पा ठरणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये धाकधूक वाढली आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक करिअरमध्ये दहावी-बारावी बोर्ड परीक्षेचा टप्पा महत्वाचा आहे. शालेय शिक्षण संपवून महाविद्यालयीन विश्वात प्रवेश करणार असतात. दहावी नंतर कोणी उच्च माध्यमिकला तर कोणी विविध पदवीका अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणार असते. शिक्षणासाठी विद्या शाखा निवडून करिअरची दिशा ठरवली जात असल्याने दहावी बोर्ड परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांची खरी कसोटी ठरणार आहे. दहावी बोर्ड परीक्षा शुक्रवार दि. 20 फेब्रुवारी रोजी सुरु होत असून शिक्षण विभाग सज्ज झाला आहे.
जिल्ह्यातील 116 केंद्रांवर 38 हजार 66 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. या परीक्षेत गैर प्रकार रोखण्यासाठी दक्षता समिती 9 भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये एका विशेष महिला भरारी पथकांचा समावेश आहे. भरारी पथके परीक्षा केंद्रावर अचानक भेटी देवून पाहणी करणार आहेत. परीक्षा केंद्रांवरील सुरक्षिततेच्या कारणास्तव 144 कलम लागू करण्यात आले आहे. परीक्षा केंद्र व परीरक्षक केंद्रांवर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रत्येक केंद्रावर आरोग्य पथकही तैनात करण्यात आल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे यांनी दिली.
दरम्यान, पहिला पेपर मराठीचा आहे. हिंदी, संस्कृतच्या पेपरनंतर एकच दिवसाची सुट्टी व दि.27 फेब्रुवारी रोजी इंग्रजीचा पेपर आहे. मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी व्याकरण व निबंधलेखनात भांबेरी उडते. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या टक्केवारीवर होतो. चांगले गुण मिळाले तर अकरावीसाठी हवे ते महाविद्यालय व विद्याशाखा निवडणे सोपे जाते. या पार्श्वभूमीवर इंग्रजीसह बोर्ड परीक्षेचे पेपर कसे असतील? काठिण्य पातळी किती असेल आदि प्रश्नांची धाकधूक विद्यार्थ्यांमध्ये वाढली आहे. दरम्यान, बोर्ड परीक्षेत कॉपीमुक्त अभियानाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. शिक्षणाधिकाऱ्यांसह विविध अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या भरारी पथकांद्वारे परीक्षा केंद्राचे व्हिडीओ शुटिंग करण्यात येणार आहे.