यंदा वाण काय द्यावे?; महिलांना सतावणारा प्रश्न | पुढारी

यंदा वाण काय द्यावे?; महिलांना सतावणारा प्रश्न

पुसेसावळी : विलास आपटे :नवीन वर्षातील पहिलाच सण मकरसंक्रात. या सणाचा उत्साह सर्वत्र पहायला मिळतो. दरवर्षी या सणाला महिलांना सतावणारा प्रश्न म्हणजे यंदा वाण काय द्यावे?, हा मोठा गहण प्रश्न सोडवताना अनेक महिलांची अक्षरश: दमछाक होते. मात्र, आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यदायी संक्रांतीचा पायंडा नव्याने पडण्याची गरज निर्माण झाली आहे. हा सण पारंपरिक वाण न देता आरोग्यदायी व पर्यावरणपूरक वाण देऊन साजरा करण्याची आवश्यकता पुढे आली आहे.

आकाशात उंचच उंच उडणारे पतंग, हळदी कुंकवासाठी साज-शृंगार केलेल्या स्त्रिया, लहान मुलांच्या बोरन्हाणाचा कार्यक्रम या सर्वच गोष्टींमुळे वातावरणात उत्साह दिसून येतो. अशा वेळी हळदी-कुंकुवाचा कार्यक्रम अनेक सुवासिनी स्त्रिया घरात आवर्जून नियोजन करतात. यावेळी महिलांना घरी बोलावून त्यांना हळदी-कुंकू दिले जाते. तिळगुळ-लाडू दिला जातो आणि सर्वात महत्त्वाचे वाण दिले जाते.
वाण म्हणजे सध्याच्या काळातील शब्द भेटवस्तू. वर्षानुवर्षे वाण देणार्‍या महिलांना दरवर्षी यंदा वाण काय द्यावे? हा मोठा गहण प्रश्न पडलेला असतो. अशा वेळी प्लास्टिकची भांडी, स्टीलची भांडी व इतर अनेक भेटवस्तू बाजारात मिळतात. मात्र, गेली दोन वर्षे कोरोनाची स्थिती पाहता या वस्तूंसोबत आपण आरोग्याशी व पर्यावरणपूरक वस्तू भेट देऊन आरोग्यदायी संक्रांत साजरी करू शकतो.

मकर संक्रांत हा पौष महिन्यातील सौभाग्यवती स्त्रियांचा अतिशय महत्त्वाचा सण आहे. पूर्वीपासूनच मकरसंक्रांतीला सुवासिनी एकमेकींना सुगड्याचे वाण देतात. या वाणात हरभरे, बोरं, ऊस, गहू, तीळ, नाणे असल्याचे आपण पाहतो. हरभरे, मटर, बोरं, गव्हाच्या लोंब्या या दिवसांमध्येच विपुल प्रमाणात उपलब्ध असल्याने वाणात त्याचा समावेश आपल्याला पहायला मिळतो. ऊस, हरभरे, बोरं, गव्हाच्या ओंब्या, तीळ सुगड्यात भरुन हे वाण महिला एकमेकींना देतात. परंतु, सध्या शहरात या गोष्टी उपलब्ध होत नसल्यामुळे हळद-कुंकू व प्लास्टिकच्या भेटवस्तू देण्याची प्रथा पडू लागली आहे. म्हणूनच यंदा महिला वर्गाने संक्रातीच्या निमित्ताने एक वेगळा विचार करून आरोग्याचे वाण देण्याची गरज आहे.

मकर संक्रातीपूर्वी वातावरणात कमालीचा गारठा असतो. प्रत्येक सजीवाला या थंडीची हुडहुडी फार गारेगार करून सोडते. कधी एकदा सूर्य तापतोय आणि ही थंडी कमी होते, असे प्रत्येकाला वाटते. तीळ व गुळाला आरोग्याच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे. तिळ आणि गुळ हे उष्ण असल्याने थंडीच्या हंगामात आपल्या शरीराला आवश्यक उष्णतेची गरज तीळगुळ पूर्ण करते आणि याच मुख्य कारणामुळे तीळगुळ देण्याची प्रथा सुरू झाली असावी.

Back to top button