शंभर दिवसांच्या उद्दिष्टपूर्तीने राज्याचा वेगवान विकास : मंत्री जयकुमार गोरे

मुख्यमंत्र्यांनी सर्वच विभागांकडून चांगले काम करुन घेतले
Jaykumar Gore |
मंत्री ना. जयकुमार गोरेPudhari Photo
Published on
Updated on

खटाव : राज्यातील महायुती सरकारमधील सर्वच विभागांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार चांगले काम करुन 100 दिवसातील साधलेल्या उद्दिष्टपूर्तीने महाराष्ट्राला वेगाने विकासात पुढे न्यायचे काम केले आहे. खूप मोठी व्याप्ती असलेल्या ग्रामविकास विभागानेही या उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने काम करताना घरकुले, रस्ते, तिर्थक्षेत्र विकासासह ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणार्‍या सर्वच योजना प्रभावीपणे राबवल्या आहेत. यापुढेही मुख्यमंत्री आणखी उद्दिष्ट देणार आहेत, ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आमच्या महायुती सरकारचे सर्वच विभाग जोमाने काम करतील, असा विश्वास ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला.

महायुती सरकारच्या पहिल्या शंभर दिवसांचे प्रगतीपुस्तक नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये ग्रामविकास विभागाला चौथे रेटींग देण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना ना. गोरे पुढे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शंभर दिवसांचा उद्दिष्टपूर्तीचा कार्यक्रम सर्वच विभागांसाठी आव्हानात्मक होता. राज्यमंत्रीमंडळाच्या सर्वच विभागांनी हे आव्हान स्वीकारुन काम केले. दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्र्यांनी दोन ते तीन वेळा आढावा घेतला. शंभर दिवसात त्यांनी सर्वच विभागांकडून चांगले काम करुन घेतले. खूप मोठी व्याप्ती असलेल्या आणि गाव खेड्यातील वाड्या वस्त्यांपासून काम करणार्‍या ग्रामविकास विभागापुढेही खूप मोठे उद्दिष्ट होते. 45 दिवसात 20 लाख घरकुलांना मान्यता देणे, त्यातील 10 लाख घरकुलांचा पहिला हप्ता देवून तातडीने कामे सुरु करणे हे आमच्यासमोरील मोठे उद्दिष्ट होते. आजपर्यंत 46 हजार घरकुलांची कामे पूर्ण झाली आहेत. मंत्रालयापासून जिल्हा परिषदा, पंचायत समित्या ते गावोगावच्या ग्रामपंचायत स्तरापर्यंत आम्ही कामे केली. तिर्थक्षेत्र विकासाचे उद्दिष्ट आम्ही पूर्णत्वाला नेतोय. ग्रामपंचायत उत्पन्न वाढीच्या तसेच करप्रणाली दुरुस्तीच्या अनुषंगाने आमच्या विभागाचे काम सुरु आहे.

ना. गोरे पुढे म्हणाले, ग्रामविकास खात्याचे राज्यमंत्री, सचिव, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि त्यांचे सहकारी, गटविकास अधिकारी ते अगदी ग्रामसेवकांपर्यंत सर्व कर्मचार्‍यांनी खूप काम करुन या विभागाला उंची प्राप्त करुन दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच हे यश मिळाले आहे. राज्याच्या विकासाचे व्हिजन असणार्‍या मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक खात्याला उद्दिष्ट देवून चांगले काम करायला भाग पाडले आहे. 100 दिवसांचा विकासाचा कार्यक्रम देवून तो परिणामकारकरित्या राबवण्याची अशी घटना देशात पहिल्यांदाच घडली असेल असेही ना. गोरे म्हणाले.

ग्रामविकासाचा चेहरा-मुख्यमंत्री समृद्ध ग्राम योजना

ग्रामविकासाच्या चेहरा म्हणून मुख्यमंत्री समृद्ध ग्राम ही स्पर्धात्मक योजना आम्ही राज्यात राबवणार आहोत. सर्व शासकीय योजना यशस्वीपणे राबवणार्‍या, गावात उत्कृष्ट स्मशानभूमी, रस्ते, गटर सुविधा, ग्रामपंचायत तसेच तलाठी कार्यालये, शाळा, अंगणवाडी इमारती सुसज्ज असणार्‍या आणि इतर निकषांमध्ये बसणार्‍या गावांसाठी ही योजना आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या धरतीवरील या योजनेला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसादिवशी ही योजना सुरु होणार आहे. या योजनेमुळे गावागावात विकासाची स्पर्धा वाढणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news