

कोडोली : एका निरागस मुलाचा हृदयविकाराच्या धक्क्याने अंत झाला. अवघ्या दहा वर्षांच्या चिमुकल्याने खेळता-खेळता आईच्या मांडीवर अखेरचा श्वास घेतला. हृदय पिळवटून टाकणार्या या घटनेने गाव सुन्न झाले असून, श्रावण अजित गावडे असे या दुर्दैवी बालकाचे नाव आहे.
कोडोलीतील आनंदनगर वसाहतीतील शिवनेरी गल्लीमध्ये राहणार्या गावडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. बुधवारी रात्री श्रावण आपल्या मित्रांसोबत गणेश मंडळाच्या शेडमध्ये खेळत होता. नेहमीप्रमाणे तो हसत-खेळत बागडत होता; पण नियतीच्या मनात वेगळेच होते. अचानक त्याला अस्वस्थ वाटू लागले. खेळ सोडून तो धावत आपल्या घराकडे गेला आणि थेट आईच्या कुशीत विसावला. आईच्या मांडीवर डोके टेकवत असतानाच त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. ज्या मांडीवर त्याला सुरक्षित वाटत होते, त्याच मांडीवर त्याने डोळे मिटले.
आईने फोडलेला हंबरडा आणि तिची आर्त किंकाळी ऐकून सगळ्यांचे हृदय हेलावले. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; पण डॉक्टरांनी हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे सांगितले. श्रावण हा इयत्ता चौथीमध्ये शिकत होता आणि तो कुटुंबाचा एकुलता एक मुलगा होता. चार वर्षांपूर्वीच गावडे कुटुंबाने आपली मुलगी गमावली होती.