

खटाव : पुढारी वृत्तसेवा
आ. जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाची शेळी समूह योजना माण तालुक्यातील दहिवडी प्रक्षेत्रावर सुरु करण्यात येणार आहे. या योजनेसाठी 10 कोटींचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. शेळी समूह केंद्रामुळे दुष्काळी भागात शेळीपालनासह पूरक व्यवसायांना चालना मिळणार आहे. राज्याच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागामार्फत पुणे महसूली विभागातील रांजणी येथे सुरु करण्यात येणारी समूह शेळी योजना माण तालुक्यातील दहिवडी येथे सुरु करण्याला मान्यता देण्यात आली आहे.
याविषयी बोलताना आ. जयकुमार गोरे म्हणाले, समूह विकासामधून शेळीपालन व्यवसायास गती देणे, नवीन उद्योजक निर्माण करणे, शेळीपालक उत्पादक कंपनी, फेडरेशन, संस्था स्थापन करुन शेळीपालन प्रशिक्षण आणि सुविधा पुरवणे, उत्पादन होणार्या मालास बाजारपेठ उपलब्ध करुन देणे, शेळ्यांच्या वजनावर विक्रीव्यवस्था, दूध प्रक्रिया, खाद्य कारखाने, निर्यात सुविधा, कृत्रिम रेतन, लसीकरण सुविधा उपलब्ध करुन देणे, स्वयंरोजगार निर्माण करणे हे उद्देश या योजनेतून साध्य करण्यात येत आहेत. या योजनेंतर्गत सामूहिक सुविधा केंद्र, दुध व दुग्धजन्य प्रक्रिया केंद्र, शेळी मांस प्रक्रिया केंद्र स्थापन केले जाणार आहे. शेळीपलनातून अनेक कुटुंबांना अर्थार्जन होणार आहे. शेतकरी आणि बेरोजगार तरुणांना यामधून आर्थिक स्थैर्य प्राप्त होणार आहे. शेळी पालनासंबधीत नवीन उद्योजक निर्माण होणार आहेत.
या योजनेद्वारे शेळीपलकांना फॉरवर्ड लिंकेजेस निर्माण करुन शेळ्यांच्या वजनावर विक्री व्यवस्था, दूध प्रक्रिया उद्योग, खाद्य कारखाने, माल साठवणुकीसाठी शीतगृहे, निर्यात सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार असल्याचेही आ. गोरे यांनी सांगितले.