पुढारी वृत्तसेवा: महायुती सरकारने सर्वसामान्य जनतेच्या पैशाची लूट चालवली असून सरकार आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहे. भारतीय रिझर्व बँकेकडे त्यांनी डिसेंबरअखेर सव्वा लाख कोटी रुपयांच्या कर्जाची मागणी केली आहे. एकूणच या सरकारने सर्वसामान्यांचा भ्रमनिरास केला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी या सरकारला सत्तेवरून खाली खेचण्याचा निर्धार केला आहे. त्यांच्या या निर्धाराला साथ द्या. कोरेगावातून आ. शशिकांत शिंदे यांच्या पाठीशी राहून राज्यात सत्ता परिवर्तनामध्ये हातभार लावावा, असे आवाहन या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा कोरेगाव तालुक्यात दाखल झाली. शहरात आ. जयंत पाटील यांच्यासह प्रमुख नेते मंडळींचे आझाद चौकामध्ये जोरदार स्वागत करण्यात आले. खेड नांदगिरी येथे जाहीर सभा झाली. व्यासपीठावर खा. अमोल कोल्हे, आ. बाळासाहेब पाटील आ. शशिकांत शिंदे, युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, माजी आमदार प्रभाकर घार्गे, अमित कदम, तालुकाध्यक्ष घनश्याम शिंदे उपस्थित होते.
आ. जयंत पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत आ. शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला असला तरी विरोधकांचे मताधिक्य कमी करण्यात यश आले असल्याचे स्पष्ट केले. शशिकांत शिंदे हे आता आमदार होतील आणि पुढच्या टर्ममध्ये निश्चितपणे खासदार होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राज्यातील सरकार अक्षरश उधळपट्टी करत आहे, हजारो कोटी रुपयांचे रस्ते तयार केले जात आहेत. इस्टिमेटपेक्षा वाढीव रक्कम दाखवली जात आहे. चंद्रावर जाण्यासाठी सहाशे कोटी रुपये खर्च होतो, मात्र येथे शंभर किलोमीटर साधा रस्ता हजारो कोटी रुपयांमध्ये करण्यात हे सरकार धन्यता मानत असल्याचा आरोप आ. जयंत पाटील यांनी केला. निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. विरोधक प्रत्येकाला आमिष दाखवतील, मोठा पाऊस पडेल, मात्र कार्यकत्यांनी ठाम राहण्याची गरज आहे. अगदी तुम्ही म्हणला तर विरोधक खेड नंदगिरीकरांसाठी चंद्रदेखील आणून देण्याची वल्गना करतील, अशी कोपरखळी आ. पाटील यांनी मारली. खा. अमोल कोल्हे यांनी पन्नास खोके एकदम ओकेचे उदाहरण देत राज्यातील महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला.
आ. शशिकांत शिंदे म्हणाले, कोरेगावातील स्थानिक लोकप्रतिनिधी मुद्दाम शासनाच्या कामात खोडा घालत आहेत. प्रशासनातील अधिकाऱ्यांवर दबाव टाकून सामान्य नागरिकांना व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना खोट्या केसेसमध्ये गुंतवण्याची धमकी देऊन त्रास देत आहेत. आता झालं तेवढं बास झालं, येथून पुढे कोणाला त्रास दिला तर गाठ माझ्याशी आहे हे, असे त्यांनी स्पष्ट केले. येत्या निवडणुकीमध्ये आपल्याला ह्या गद्दारांना घरी बसवायचं आहे.
एखादा स्थानिक नागरिक अडचण घेऊन गेला तरी त्याला गमजा घालून जबरदस्ती त्याचा पक्ष प्रवेश केला म्हणून जाहीर केले जाते. खरं तर अनेक जणांना पैसे देऊन, धमकी देऊन, विकासकामांमध्ये अडथळे टाकून अथवा खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याचा धमकी देऊन पक्ष प्रवेश करून घेतले हे चुकीचं आहे. ही हुकुमशाही आपल्याला मोडून काढायची आहे, असा निर्धार आ. शशिकांत शिंदे यांनी केला.
यावेळी मेहबूब शेख, आमदार बाळासाहेब पाटील यांची भाषणे झाली. दीपक कदम यांनी प्रास्ताविक केले. घनश्याम शिंदे यांनी आभार मानले.
शिवस्वराज्य यात्रेमध्ये भाषण करणाऱ्या प्रत्येक नेत्याने प्रशासन आणि पोलीस दल हे सरकारच्या आणि सरकारमधील घटकांच्या इशाऱ्यावर चालत असल्याचा आरोप केला. विरोधकांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात असून बदलीच्या भीतीपोटी असे प्रकार सुरू असल्याचे त्यांनी कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आणून दिले. मेहबूब शेख यांनी थेट जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख यांच्यावर टीका करत आगामी वाटचालीचे सुतोवाच केले. आ. शशिकांत शिंदे यांनी पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी ही चांगली माणसे आहेत. मात्र विरोधकांच्या दबावापोटी त्यांना खोटी कारवाई करावी लागत आहे, हे योग्य नाही. आचारसंहिता लागू दे त्यानंतर मी एकेकाकडे बघतो, असा इशारा त्यांनी दिला.