

सातारा; पुढारी वृत्तसेवा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गा-वर लिंब गावच्या हद्दीत असलेल्या एका पेट्रोलपंपाच्या पाठीमागे पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या वेश्या अड्ड्यावर सातारा तालुका पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी शैलेंद्र शशी नायर (मूळ रा. केरळ, हल्ली रा. लिंब ता. सातारा) याला अटक केली असून तीन महिलांसह एका अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे.
सातारा तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत लिंब फाट्यानजीक असलेल्या पेट्रोलपंपामागे पत्र्याच्या शेडमध्ये नायर हा गेली अनेक महिने वेश्या अड्डा चालवत होता. त्यासाठी तो बंगाल येथून महिलांना आणत असून त्यांना जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडत असल्याचे बोलले जात होते. याची माहिती तालुका पोलिसांना कळल्यानंतर पोलिसांनी कॅनॉलजवळ असलेल्या पत्र्याच्या शेडवर अचानक छापा टाकला असता तेथे तीन महिला या वेश्या व्यवसायासाठी बंगालमधून आणल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी नायर याला ताब्यात घेतले. नायर याने वेश्या अड्डा चालवत असल्याची कबुली दिल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान पोलिसांनी एका अल्पवयीन मुलीचीही सुटका केली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर अधीक्षक अजित बोर्हाडे, सहाय्यक पोलीस अधीक्षक आंचल दलाल, पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अभिजीत चौधरी, पोलीस उपनिरीक्षक शितल जाधव, सहाय्यक फौजदार वंजारी, हवालदार सुहास पवार, मालोजी चव्हाण, धीरज कुंभार, किरण जगताप, रमेश शिखरे, विश्वनाथ आंब्राळे, सिमा भुजबळ यांनी केली.