

सातारा; पुढारी वृत्तसेवा : नुकताच दहावी राज्य बोर्डचा निकाल जाहीर झाला असून उत्तीर्ण विद्यार्थ्यांची महाविद्यालयांमध्ये चाचपणी सुरू झाली आहे. मात्र अद्याप सीबीएससी बोर्डचे निकाल जाहीर न झाल्याने शिक्षण विभागाकडून प्रवेशाबाबत परिपत्रक काढले नसले तरी कनिष्ठ महाविद्यालयांनी आपापल्या स्तरावर प्रवेश नोंदणी सुरू केली आहे. शैक्षणिक उपक्रम, गुणवत्ता, शैक्षणिक कामकाज, फी, सोयी सुविधा आदि माहिती घेण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी व पालकांची वर्दळ वाढली आहे.
दहावी राज्य बोर्ड परीक्षेचा नुकताच निकाल लागला आहे.जिल्ह्याचा परीक्षेचा निकाल 98.29 टक्के लागल्याने उत्तीर्णांचा टक्काही वाढला आहे. प्रोव्हीजनल गुणपत्रक हातात आल्याने विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. सीबीएससी बोर्डचा दहावी परीक्षेचा निकाल अद्याप लागला नसल्याने शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशाबाबत कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत. मात्र कनिष्ठ महाविद्यालयांनी आपापल्या स्तरावर प्रवेश नोंदणी सुरु केली आहे. गुणपत्रक मिळेपर्यंत कोणकोणते विषय, प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची जुजबी माहिती घेण्यासाठी विद्यार्थी व पालकांची चाचपणी सुरु झाली आहे. कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक उपक्रम, गुणवत्ता, शैक्षणिक कामकाज, फी, सोयी सुविधा आदि माहिती घेण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी व पालकांची वर्दळ वाढली आहे. महाविद्यालयांसाठी गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी प्रवेश नोंदणी महत्वाची ठरत आहे. विद्यार्थी पालकांसाठी गुणवत्ता व निकोप शैक्षणिक वातावरणाला प्राधान्य देण्यात येते. अकारावी प्रवेश घेतला की बारावी पासआऊट होवूनच विद्यार्थी बाहेर पडतात. अनेक विद्यार्थी अकरावी व बारावीच्या नियमित अभ्यासक्रमाबरोबर उच्च शिक्षण प्रवेश परीक्षांचीही तयारी करतात. त्यादृष्टीने सोयीच्या महाविद्यालयाला अकरावी प्रवेशामध्ये प्राधान्य दिले जात आहे. अकरावी प्रवेश नोंदणीबरोबर क्रॅश कोर्सची तयारी करुन घेतली जाते का नाही याचीही माहिती विद्यार्थी पालकांमधून घेतली जात आहे. सध्या अकरावी प्रवेश नोंदणी केली जात असली तरी दहावी गुणपत्रक हातात आल्यावरच प्रवेश प्रक्रिया खर्या अर्थाने सुरु होणार आहे. त्यामुळे दहावी उत्तीर्णांना आता दहावी बोर्डाकडून येणार्या गुणपत्रकाची आस लागली आहे.