सांगली : पुढारी वृत्तसेवा : पान दुकाने व दुचाकी चोरी करणार्या दोन सराईत चोरट्यांना अटक करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला बुधवारी यश आले. पान दुकानातील माल यशवंतनगर येथे विक्रीला गेल्यानंतर त्यांना पकडले. त्यांच्याकडून 70 हजार रुपयांचा माल जप्त केला. संशयित दोघेही अल्पवयीन आहेत.
सांगली शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तीन व विश्रामबाग हद्दीतील एक असे चार गुन्हे उघडकीस आले आहेत. जामवाडीतील महादेव सूर्यवंशी यांचे पद्मा टॉकीजवळ पान दुकान आहे. दोन दिवसापूर्वी मध्यरात्री हे दुकान फोडून सिगारेट व तंबाखूचे बॉक्स चोरीला गेले होते. सूर्यवंशी यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.
गेल्या दोन दिवसात सातत्याने शहरात होत असलेल्या चोरीच्या घटनांची जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. बसवराज तेली यांनी गंभीर दखल घेतली. डॉ. तेली यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला या गुन्ह्यांचा छडा लावण्याचे आदेश दिले होते. पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या पथकाला दोन अल्पवयीन दुचाकीवरून तंबाखू व सिगारेटचे बॉक्स यशवंतनगर येथे विक्रीला येणार असल्याची माहिती मिळाली.
पथकाने दोघांना सापळा रचून पकडले. त्यांच्याकडून एक मोपेड व दुचाकी अशा दोन गाड्या जप्त केल्या. मोपेडवर सापडलेल्या पोत्याची झडती घेतल्यानंतर त्यामध्ये पान दुकानातील माल सापडला. याबद्दल त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्यांनी हा माल पद्मा टॉकीजजवळील पान दुकान फोडून चोरल्याची कबुली दिली. तसेच गेल्या महिन्यात कॉलेज कॉर्नरवरील पान दुकान फोडल्याचेही सांगितले.
रतनशीनगर व मीरा हौसिंग सोसायटीतून दोन दुचाकी चोरल्याची कबुली दिली. यातील एक अल्पवयीन संशयिताने कर्हाड (जि. सातारा)
येथील गुंड सुदर्शन यादव याच्या मदतीने तेथील हॉटेल व्यावसायिकावर खुनी हल्ला केल्याचे निष्पन्न झाले आहे. संशयितांना पुढील तपासासाठी शहर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. हवालदार बिरोबा नरळे, संदीप पाटील, सागर लवटे, अनिल कोळेकर व विक्रम खोत यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.