

सांगली; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात यावर्षी कला, वाणिज्य, विज्ञान, संयुक्त आणि डिप्लोमा, आयटीआय अशा विविध शाखेत एकूण ४१ हजार ८५२ विद्यार्थ्यांनी आतापर्यंत अकरावीत प्रवेश घेतला आहे. यामध्ये सर्वाधिक प्रवेश विज्ञान शाखेत २२ हजार ३९८ विद्यार्थ्यांनी घेतला आहे. अद्यापही काही ठिकाणी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.
यावर्षी दहावीच्या परीक्षेेत जिल्ह्यातील ३७ हजार ५७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९८.१० टक्के लागला आहे. दि. १२ जुलैपासून अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली.
जिल्ह्यात अकरावी, आयटीआय आणि डिप्लोमाची प्रवेश क्षमता ५१ हजार २११ इतकी आहे. तर पास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 37 हजार ५७६ आहे. विद्यार्थी उत्तीर्ण होण्याच्या तुलनेत प्रवेश क्षमता जास्त आहे. मात्र, विद्यार्थ्यांचा ठराविक शाखांमध्ये आणि नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याकडे कल जास्त होता. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे यंदाही विज्ञान शाखेत प्रवेशासाठी अनेक कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची चढाओढ पहायला मिळाली. याचाच गैरफायदा घेऊन काही कॉलेजमध्ये देणगीच्या नावाखाली विद्यार्थी आणि पालकांची 'लूट' झाल्याच्या तक्रारी आहेत.
कला, वाणिज्य, विज्ञान शाखेचे बहुसंख्य जागेवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. त्यामुळे नियमितपणे कॉलेज सुरू झाली आहेत. मात्र, डिप्लोमा आणि आयटीआय शाखेचा मात्र अद्यापही प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. पुढील महिन्यापर्यंत ही प्रक्रिया चालू राहणार आहे. त्यानंतर किती विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला हे निश्चित होणार आहे. जिल्ह्यात अकरावीची प्रवेश क्षमता ५१ हजार २११ असून यापैकी ४१ हजार ८५२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. अद्याही सुमारे ९ हजार ३५९ जागेसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.
प्रवेश घेतलेल्या तरुणाईमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. विद्यार्थ्यांच्या गर्दीने कॉलेज कॅम्पस बहरून गेले आहे. कॉलेजमध्ये सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे.