

सांगली; पुढारी वृत्तसेवा : सांगलीत कृष्णा नदीतील पाणी पातळी कमी झाल्याने साटपेवाडी बंधार्यातून 500 क्युसेक विसर्गने पाणी नदीपात्रात सोडले आहे. शुक्रवारपर्यंत हे पाणी सांगलीत येईल. पाणी टंचाईचा प्रश्न सुटेल, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी दिली.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाटबंधारे विभागाने सांगली बंधार्याच्या फळ्या काढल्या आहेत. त्यामुळे सांगलीत नदीपात्रातील पाणी पातळी कमी झाली आहे. नदीपात्रातील महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाच्या 'इंटेकवेल' उघड्या पडल्या आहेत. पाणी पातळी कमी झाल्याने कृष्णेतून उपसा केला जाणार्या पाण्याचा डिस्चार्ज कमी झाला आहे. रोज सुमारे 1 कोटी लिटर पाणी उपसा कमी झाला आहे. त्याचा परिणाम सांगली, कुपवाडच्या पाणीपुरवठ्यावर झाला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने कृष्णेत पाणी सोडण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडे केली. महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांच्याशी चर्चा केली.
सांगलीत पाणीपातळी पुरेशी होईल कार्यकारी अभियंता देवकर म्हणाल्या, गुरुवारी साटपेवाडी बंधार्यातून 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग कृष्णा नदीत करून घेतला आहे. हे पाणी शुक्रवारी सांगलीत पोहोचेल. सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी पुरेशी होईल. गरज पडली तर विसर्ग आणखी वाढवू. सांगलीत नदी पात्रात महापालिकेच्या 'इंटेकवेल'जवळ भराव पडला आहे. महापालिकेने तो काढणे आवश्यक आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सांगली बंधार्याच्या फळ्या काढल्या आहेत. तरिही 150 पैकी 30 फळ्या बंधार्याला अजून आहेत. मान्सूनचा पाऊस लांबल्याने प्रश्न निर्माण झाला आहे. दोन दिवस वाट पाहू. पाऊस लांबल्यास सांगली बंधार्याला फळ्या पुन्हा घालू, असेही पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता देवकर यांनी सांगितले.