

इस्लामपूर ः पुढारी वृत्तसेवा : 10 हजार रुपयांच्या मुदलासाठी 48 हजार रुपयांची मागणी करून जमाव जमवून तिघांना काठी, बेल्टने मारहाण केल्याचा प्रकार सोमवारी रात्री साखराळे (ता. वाळवा) येथे घडला. या मारहाणीत गजानन शिवाजी कांबळे, त्यांचा मुलगा हर्षवर्धन, मेहुणा राजेंद्र प्रल्हाद कांबळे (रा. साखराळे) हे जखमी झाले आहेत. जखमी गजानन यांनी सहाजणांविरोधात इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
रवींद्र भीमराव माने, दादा भोसले, शिवाजी कदम, जमीर पठाण, विवेक कदम, शेंडे (पूर्ण नाव माहीत नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. संशयित रवींद्र माने, दादा भोसले यांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, गजानन कांबळे यांनी रवींद्र माने याच्याकडून 10 हजार रुपये व्याजाने घेतले होते. 10 हजाराच्या मुदलासाठी गजानन यांनी 13 हजार रुपये दिले होते. त्यानंतर सोमवारी रात्री संशयितांनी गजानन यांच्याकडे व्याजासह 35 हजार रुपयांची मागणी केली. त्यावेळी गजानन यांनी, 'दोन ते चार दिवसात पैसे देतो', असे सांगितले.
त्यावेळी संशयितांनी गजानन, हर्षवर्धन, राजेंद्र यांना काठी, बेल्ट, लाथाबुक्क्यांनी मारहाणकेली, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी
संशयित रवींद्र माने, दादा भोसले यांना अटक
केली आहे. त्यांना गुरुवारी न्यायालयात हजर
करण्यात येणार आहे.