सांगली : पुढारी वृत्तसेवा महासभेचे कामकाज न होताच महापौरांनी सभा गुंडाळली आहे. आजची महासभाही बेकायदेशीर झाली आहे. त्याविरोधात आयुक्त, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे तक्रार करणार आहे, असे भाजपचे गटनेते विनायक सिंहासने यांनी सांगितले. या बेकायदा महासभेबाबत न्यायालयात दाद मागू. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, काँग्रेसचे नेते डॉ. विश्वजित कदम यांच्या कानावर घालू, असे भाजपचे नेते शेखर इनामदार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सिंहासने म्हणाले, दि. 18 फेबु्रवारीच्या सभेतील सर्व विषय रद्द करावेत. त्यासाठी मतदान घ्यावे व रद्द केलेले विषय पुढील महासभेपुढे घ्यावेत, या मागणीसाठी भाजपतर्फे औचित्याचा मुद्दा महासभेत उपस्थित केला होता. मात्र महापौरांनी सभेतून पळ काढला. त्याविरोधात आयुक्त, नगरविकासच्या प्रधान सचिवांकडे तक्रार करणार आहे. महासभेतून नगरसचिवांनीही पळ काढला. त्यांच्यावर कारवाई करावी.
16 ते 17 कोटींच्या विषयावर चर्चा नको का? : शेखर इनामदार
इनामदार म्हणाले, मागील सभेतील विषयांना विरोध नव्हता आणि नाही. त्यातील काही महत्त्वाच्या विषयांवर सभागृहात चर्चा होणे आवश्यक होते. भू-संपादनासाठी 16 ते 17 कोटी रुपये दिले जाणार आहेत. त्यावर चर्चा नको का? ही जागा कोणती? तिथे महापुराचे पाणी येते तर मग त्यावर उपाययोजना काय करायची, यावर चर्चा करण्याची गरज होती. रहिवासी विभागात सात मजली कॅन्सर हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय झाला आहे. त्याला नागरिकांचा व त्या भागातील नगरसेवकांचा विरोध आहे.
संतोष पाटील म्हणाले, मागील महासभेवर काँग्रेस, भाजपने बहिष्कार टाकला होता. सभेला कोरम नव्हता. तरीही महापौरांनी हट्टाने व बेकायदेशीरपणे सभा घेतली. त्या सभेचे इतिवृत्त कायम करण्यास आमचा विरोध आहे. काँग्रेस व भाजपचे 52 सदस्य तसेच राष्ट्रवादीचे योगेंद्र थोरात अशा एकूण 53 सदस्यांचे पत्र शासनाला दिले जाणार आहे. दि. 18 एप्रिलची महासभाही बेकायदेशीर झाल्याची तक्रार केली जाणार आहे.
महापौर सूर्यवंशी म्हणाले, दोन तास सभा कामकाज शांततेत सुरू होते. सभा गुंडाळायची असती तर दोन तास कामकाज चालले असते का? मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्याचा विषय महासभेपुढे पहिल्यांदा असताना व त्यावर सविस्तर चर्चा करणे अपेक्षित असतानाही भाजपने औचित्याचा मुद्दा उपस्थित करून महासभेत गोंधळ सुरू केला. सभा कामकाज होऊ दिले नाही.
नेत्यांशी चर्चा करून निर्णय : काँग्रेस गटनेते मेंढे
काँग्रेसचे गटनेते संजय मेंढे म्हणाले, दि. 18 फेब्रुवारीच्या ऑनलाईन सभेपुढे शंभरहून अधिक विषय, उपसूचना, एक (ज) खालील प्रस्ताव होते. ऑनलाईन सभेत सविस्तर चर्चा करता येत नसल्याने ऑफलाईन सभेसाठी महासभेवर बहिष्कार घातला होता. मात्र भाजपच्या गैरहजर नगरसेवकांचीही उपस्थिती दाखवून कोरम पूर्ण झाल्याचा बनाव केला आहे. ही महासभाही (दि. 18 एपिल) महापौरांनी मनमानी करत गुंडाळली. त्याविरोधात काँग्रेसच्या 20 पैकी 14 नगरसेवकांची स्वाक्षरी केली आहे. काँग्रेस नेत्यांशी याबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे.