

सांगली : विवेक दाभोळे : सांगली जिल्ह्यातील फळबागांत पेरूचे महत्त्व आणि लागवड वाढू लागली आहे. तीन वर्षापूर्वी जिल्ह्यात २४७.८५ हेक्टर असलेले पेरूचे क्षेत्र या हंगामात तिपटीने वाढून ६३१.४४ हेक्टर झाले आहे. संपूर्ण जिल्ह्यात पेरूचे क्षेत्र वाढत आहे. मिरज आणि आटपाडी पेरूसाठी खास डेस्टिनेशन ठरू लागले आहेत.
कमी खर्चात आणि शासन योजनांचा लाभ घेऊन पेरू बागांचा पर्याय अनेक शेतकरी निवडू लागले आहेत. नवीन पेरू लागवड करण्यासाठी ऑगस्ट ते सप्टेंबर हा सर्वोत्तम काळ ठरतो. नेमका याच काळात अवकाळी पाऊस होत असल्याने अनेक शेतकरी आता पारंपरिक पिके सोडून नवीन वाट शोधत आहेत. लागवडीचा बदलला ट्रेंड जिल्ह्यातील तालुकानिहाय या हंगामातील पेरूचे क्षेत्र पुढीलप्रमाणे (हेक्टरमध्ये) : जत : ३९.४०., आटपाडी : ८३.४०., मिरज : २२९.०., कवठेमहांकाळ : ५२.००., वाळवा : २२.९४., तासगाव : ३५. ६०, खानापूर २१.००., पलूस : ३०.००., कडेगाव : १४.००., शिराळा : ४.००., एकूण ६३१.४४.
सामान्य तापमान असलेल्या भागात पेरूची लागवड करताना जास्त सिंचन, देखभाल खर्च लागत नाही. वेळोवेळी व्यवस्थापनाची कामे केली तर चांगल्या उत्पन्नाची हमी राहते. मात्र पेरूच्या बागेत सर्वाधिक खर्च पहिल्या दोन वर्षांतच होतो. साधारण एक हेक्टर जमिनीवर पेरूची लागवड करण्यासाठी १० लाख रुपये खर्च येतो. त्यानंतर प्रत्येक हंगामात किमान प्रति रोप २० फळे मिळतात. शेतीमाल बाजारात किमान ५० रुपये किलो दराने विकली जातात. एका किलोत किमान तीन फळे बसतात.
पेरूच्या बाजारपेठेसाठी उत्पादकांना स्थानिक बाजारपेठेची हमी कायम आहेच, शिवाय पुण्या-मुंबईत देखील अनेक वेळा पेरू मोठ्या प्रमाणात पाठवला जातो.
सुधारित पेरूची लागवड केल्यास सामान्य वाणांपेक्षा जास्त उत्पादन घेता येते. प्रामुख्याने शेतकरी व्हीएनआर बिही, अर्का अमुलिया, अर्का किरण, हिसार सफेदा, हिस्सार सुरखा, सफेद जाम आणि कोहिर सफेद या संकरित वाणांचा वापर करत आहे. अॅपल रंग, स्पॉटेड, लखनौ- ४९, ललित, श्वेता, अर्का मृदुला, सीडलेस, रेड फ्लॅश, पंजाब पिंक, अलाहाबाद सफेदा, अलाहाबाद सुरखा, अलाहाबाद मृदुला आणि पंत प्रभात या जातीही प्रचलित आहेत.