

विटा; पुढारी वृत्तसेवा : दिल्लीत बसून राष्ट्रवाद शिकवणारांनी आता आत्मपरीक्षण करावे. आपल्या देशात धर्मवाद हा राष्ट्रवाद कधीच असू शकत नाही. धर्मावर आधारीत नागरिकत्त्व ही संकल्पना ही या देशात असू शकत नाही. आमचे नागरिकत्व धर्माशी नव्हे तर घटनेशी बांधील आहे, असे प्रतिपादन माजी खासदार वृंदा करात यांनी केले.
येथील क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठातर्फे देण्यात येणारा क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार कॉ. वृंदा करात यांना प्रदान करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी ज्येष्ठ साहित्यिका तारा भवाळकर, प्राचार्य डॉ. विश्वास सायनाकर, आमदार अरूण लाड, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, भाई सुभाष पवार, अॅड. सुभाष पाटील, कॉ. अजित अभ्यंकर, अॅड. नानासाहेब पाटील, इंद्रजित पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
कॉ. वृंदा करात म्हणाल्या, भाजप सत्ता मिळवण्यासाठी हिंदुत्त्वाचा हत्यारासारखा वापर करीत आहे. देशात लाखो कामगार उपाशी मरत आहेत. देशातील काही मोजके उद्योगपती साधनसंपत्तीची लूट करीत आहेत. त्यावेळी तुमचा धर्म कुठे असतो. देशातील शंभर अतिश्रीमंत लोकांची संपत्ती ही 55 करोड जनतेच्या संपत्तीपेक्षा जास्त आहे. जेव्हा लोक कोरोना आणि लॉकडाऊनमध्ये जगण्यासाठी संघर्ष करीत होते, तेव्हा देशातील श्रीमंतांची संपत्ती 23 लाख करोडवरून 57 हजार लाख करोडवर गेली. इतकी असमानता देशात वाढत असताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणतात महागाईचा प्रश्नच देशात नाही, अशी टीका करात यांनी केली.
त्या म्हणाल्या, क्रांतिसिंह नाना पाटील हे दोन वेळा सामान्य लोकांच्यातून खासदार झाले. त्यांची संपत्ती किती होती? मात्र आज देशातील 80 टक्के खासदार हे करोडपती आहेत. सर्वसामान्य माणूस संसदेत जाईल काय, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. आपल्याला क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या विचारांनी वाटचाल करावी लागेल. आज देशाला खर्या अर्थाने प्रतिसरकारची गरज आहे. चळवळीतील अनेक लोकांना सरकारने तुरुंगात डांबले आहे. आपल्याला मिळालेला पुरस्कार चळवळीतील अशा कार्यकर्त्यांना समर्पित करीत असल्याचेही करात यांनी यावेळी जाहीर केले.
डॉ. तारा भवाळकर म्हणाल्या, गांधी आणि नेहरूंचा द्वेश करणारे नाईलाज म्हणून त्यांच्या नावाचा जय जयकार करीत आहेत. दडपशाही आणि दडपणाखाली सामान्य जनता आजच्या सत्ताधार्यांचे कौतुक करीत आहे. आजच्या इतका इतर विचारधारांबद्दल पराकोटीचा द्वेष यापूर्वी कधीच नव्हता.
यावेळी शेतकरी संघटनेचे रघुनाथ पाटील, भाई संपतराव पवार, प्रा. डॉ. बाबुराव गुरव, जयराम मोरे, विश्वनाथ गायकवाड, गजानन सुतार, क्रांती पाटील, प्राची पाटील, स्नेहा पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित
होते.
जवळपास 4 हजार 700 कोटी रुपयांची देणगी एकट्या भाजपला मिळाली. अशा देणग्यांचा उपयोग देशातील विरोधी पक्षांची सरकारे पाडण्यासाठी भाजप करीत आहे. या देणग्यांतूनच महाराष्ट्रातील मुख्यमंत्री शिंदेसह चाळीस आमदारांचा पंचतारांकित हॉटेलांचा खर्च केला गेला आहे, असा गौप्यस्फोट माजी खासदार कॉ. वृंदा करात यांनी केला.