

सांगली : पुढारी वृत्तसेवा : टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये) गुणांमध्ये फेरबदल, बनावट प्रमाणपत्र आणि टीईटी घोटाळ्यातील मुख्य आरोपी शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष तुकाराम सुपे यांच्याशी तडजोड करून सांगली जिल्ह्यातील 123 शिक्षकांनी नोकरी मिळविली आहे. या शिक्षकांवर कारवाई व्हावी, अशी मागणी स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष सुनील फराटे यांनी शिक्षण आयुक्तांकडे केली आहे.
फराटे यांनी शिक्षण आयुक्तांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले की, शिक्षक पात्रता परीक्षा 2019 मध्ये घेतली होती. या परीक्षेतील गुणामध्ये वाढवून फेरबदल केलेले 120 सांगली जिल्ह्यातील शिक्षक आहेत. तसेच अपात्र असताना बनावट प्रमाणपत्र तयार करून घेतलेले 3 उमेदवार जिल्ह्यात परीक्षेला बसलेले आहेत. शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्यातील मख्य आरोपी सुपे यांच्या संपर्कात सांगली जिल्हातील चार शिक्षक होते. टीईटी घोटाळ्यात सांगली जिल्ह्यातील आठ शिक्षक अडकल्याचे शिक्षण विभागाचे अधिकारी सांगत असले तरी प्रत्यक्षात 123 शिक्षकांचा समावेश आहे. शासनाने अपात्र केलेल्या यादीमध्ये त्यांच्या नावाचा समावेश आहे. तरीही त्या शिक्षकांना टीईटी घोटाळ्यातून कुणाच्या आशीर्वादामुळे मुक्त केले आहे. या सर्व गैरकारभाराची चौकशी झाली पाहिजे. तत्कालीन शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांच्या कालावधीमध्ये शिक्षण संस्था चालकांना हाताशी धरून अनेक बेकायदेशीर शिक्षकांच्या वैयक्तिक प्रस्तावांना मान्यता दिल्या आहेत. या सर्व प्रकाराची सखोल चौकशी करून दोषी अधिकार्यांवर शासनाने कारवाई केली पाहिजे.